सत्ताधारी व स्वाभिमानी दोन्ही पँनेल एकाच नाण्याच्या दोन बाजू : गोविंद पाटील

राधानगरी : शिक्षक बॅंकेत सन २००४ ते २०१५ कालावधीत मोठ्या प्रमाणावर झालेल्या तोट्यास दोन्ही पँनेलमधील नेतेमंडळी जबाबदार आहेत. आज तेच नेते बँक तोट्यात घालवल्याचे एकमेकांवर आरोप करीत असून तोट्याला दोघेही तितकेच जबाबदार असल्याने सभासद त्या दोन्ही पँनेलला नाकारून सभासद हितासाठी संघर्ष करणाऱ्या ‘आप’लं पुरोगामी – समिती- संघ समविचारी परिवर्तन पँनेल नक्की निवडून देणार आहेत, असा विश्वास पँनेल प्रमुख गोविंद पाटील यांनी व्यक्त केला.

राधानगरी संपर्क दौरा प्रसंगी ते बोलत होते. पाटील पुढे म्हणाले २००४ ते २००९ या काळात संघ (पाटील व थोरात गट) सत्तेत होते व समितीचे संचालक विरोधी संचालक म्हणून होते. त्या काळात कोणाचीही विरोधी भूमिका तर दिसली नाहीच उलट सर्व विरोधक सत्तेत सामील झाले. त्यामुळे या काळातील तोट्याला सर्वस्वी आतच्या दोन्ही पँनेलमधील नेतेमंडळी आहेत. उमेदवारी न मिळाल्याने कोल़ांट्या उड्या मारणा-यांना सभासद चांगलेच ओळखून आहेत. तसेच २००९ ते २०१५ या काळात तर पाटील गट संघाची एक हाती सत्ता होती. त्यांच्याही काळात बँक साडेतीन कोटी रुपये तोट्यातच होती. आताच्या सत्तारूढ पँनेलचे नेतृत्व करणारे ६ वर्षे एकटे चेअरमन राहिले. त्यावेळी त्यांना महिला संचालिका भगिनींना व बहुजन समाजाच्या संचालकांना चेअरमन करावे वाटले नाही, मग त्यावेळी महिलांचा सन्मान व बहूजन समाजाचा सन्मान कोठे गेला होता? निवडणूक आली कि ही नेतेमंडळी भूलथापा मारून सभासदांना फसवत आली आहेत. बँक निवडणुकीत बँक वाचवण्यासाठी काय केले? सभासद हितासाठी काय केले हे सांगणे गरजेचे असताना संघटनात्मक काम सांगून दोन्ही पँनेलची नेतेमंडळी सभासदांना फसवू पाहत आहेत. संघटनात्मक कामे व सामाजिक कार्य करण्यात आम्हीही सातत्याने अग्रेसर आहोत सोबत बँक वाचवण्यासाठी सातत्याने २० वर्षे केलेला संघर्ष व दिलेला लढा सभासद जाणून आहेत. त्यामुळे सभासद मोठ्या फरकाने परिवर्तन पॅनल विजयी करतील असा विश्वास गोविंद पाटील यांनी व्यक्त केला.

आजच्या प्रचार दौऱ्यात राधानगरी उमेदवार सर्जेराव ढेरे,रंगराव वाडकर, संदिप नलवडे , तानाजी पाटील आदी सहभागी होते.