सर्वसामान्य शिक्षक केंद्रबिंदू मानूनच शिक्षक बँकेचा कारभार : राजाराम वरुटे

कोल्हापूर : सर्वसामान्य शिक्षक केंद्रबिंदू मानूनच शिक्षक बँकेचा कारभार केला. अडचणीतील बँकेला गत वैभव प्राप्त करून दिले. बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला चेअरमनपदाची संधी देताना सर्व संचालकांना पदे देण्याचे काम केले. सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आलेल्या विरोधकांना बँकेतील चांगले काम दिसत नाही. त्यांच्याकडे कोणताही मुद्दा नसल्यामुळेच व्यक्तिगत टीका करत आहेत असा टोला शिक्षक संघाच्या सत्तारूढ पॅनेलचे प्रमुख राजाराम वरुटे यांनी विरोधकांना लगावला.

शिक्षक बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ‘सत्तारूढ शिक्षक संघ’ पॅनलच्या प्रचारार्थ मुरगुड (ता. कागल) येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, बँकेत सभासहीताचा कारभार करतानाच, शासन पातळीवर प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शिक्षक संघाच्या माध्यमातून प्रयत्न केले. अनेक प्रश्न मार्गी लावले हे काम विरोधकांना दिसत नाही. केवळ व्यक्तीदोषातून आरोप करत आहेत परंतु सुज्ञ मतदार त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत.

शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी बापट म्हणाले, गेल्या सात वर्षात बँकेतील प्रगतीमुळे आम्ही समाधानी आहोत. नवीन चेहऱ्यांच्या रूपाने कार्यकर्त्याना संधी देण्याचे काम आम्ही विद्यमान संचालकांनी केले आहे.

चेअरमन बाजीराव कांबळे म्हणाले, 2009 पूर्वी शिक्षक बँकेचे सर्वात मोठे नुकसान ज्यांच्या हातून झाले तेच लोक आज विरोधी आघाडीचे नेतृत्व करत आहेत. यासारखी दुर्दैवी गोष्ट बँक निवडणुकीच्या इतिहासात झालेली नाही. त्यामुळे बँकेचे नुकसान करणाऱ्या व बँकेला यापूर्वी डबघाईला आणणाऱ्या अशा नेतृत्वाच्या हाती सभासदांनी आपली जिव्हाळ्याची मातृसंस्था असलेली बँक देऊ नये. सत्ताधारी पॅनेलच्या नेतृत्वाने बँकेला वैभव प्राप्त करून दिले आहे.त्यामुळे सत्तारूढ पॅनलच्या सर्व उमेदवारांना मताधिक्याने विजयी करून विजयाची हॅट्रिक करावी.

यावेळी शिवाजीराव पाटील, रवींद्र नागटिळे, माजी संचालिका कावेरी चव्हाण, रेखा जाधव,गजानन गुंडाळे, कृष्णात धनवडे, सर्जेराव सुतार यांची भाषणे झाली. माजी संचालक वसंत जाधव, प्रवीण अंगज,दस्तगीर फकीर, उत्तम पाटील, विजय पाटील, विश्वनाथ डफळे, बाबाजान पटेल, संदीप शिंदे ,आनंद पाटील आदी उपस्थित होते.

स्वागत प्रास्ताविक बँकेचे विद्यमान संचालक जी.एस. पाटील यांनी केले .कागल तालुका उमेदवार पांडुरंग रावण यांनी आभार मानले.