विज्ञान विषय कृती समितीचा शिक्षक संघाच्या सत्तारूढ पॅनलला पाठिंबा

कोल्हापूर : गेली अडीच वर्ष सुरू असलेला विज्ञान विषय शिक्षक पदोन्नतीसाठी असलेला संघर्ष शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांनी लक्ष घातल्यामुळे मार्गी लागला. सर्व संघटनांनी साथ सोडली पण शेवटपर्यंत राजाराम वरुटे व शिक्षक संघ पाठीशी राहिले. हसन मुश्रीफ यांच्याकडे हा प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला म्हणून विज्ञान विषय शिक्षक पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला. ३५० च्यावर शिक्षकांना आदेश मिळाले याचे सर्वस्वी श्रेय राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघाला जाते. या ऋणातून उतराई होण्यासाठी सध्या होऊ घातलेल्या शिक्षक बँकेच्या निवडणुकीत शिक्षक संघ प्रणित सत्तारूढ पॅनेलला विज्ञान विषयी कृती समितीने पाठिंबा जाहीर केला.

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी येथे अडीचशे विज्ञान शिक्षकांसह विज्ञान विषय शिक्षक पदोन्नती घेतलेले जिल्ह्यातील विज्ञान विषय शिक्षक उपस्थित होते. गेली अडीच वर्ष सुरू असलेला संघर्ष आणि न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले विज्ञान विषयशिक्षक यांना 21 मे 2022 रोजी न्याय मिळाला. याचे सर्वस्वी श्रेय शिक्षक संघ व राजाराम वरुटे यांना जाते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत वरिष्ठ वर्गासाठी एक विज्ञान विषय शिक्षकाची नेमणूक असताना कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आडमुठ्या धोरणामुळे जिल्ह्यातील बहुतांश शाळात गेल्या ४ वर्षांपासून विज्ञान विषय शिक्षक नेमले नव्हते. शासन निर्णयाचा आधार घेत विज्ञान विषय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. विभागीय आयुक्त कार्यालय, मंत्रालय स्तरावर देखील पाठलाग केला, पण त्याला यश आले नाही.अक्षरशः कोल्हापूर जिल्हा परिषद प्रशासनाने हा निर्णय घेण्यासाठी तब्बल २.५ वर्ष घेतली आणि अखेरीस हा प्रश्न राजाराम वरुटे सरांच्या कानावर विज्ञान विषयी शिक्षक कृती समितीने घातला. वरुटे यांनी संघटने च्या निवेदनाखाली मुश्रीफ साहेब यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. आणि अवघ्या काही दिवसात मुश्रीफ यांनी मंत्रालयात कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यासमवेत बैठक लावली,पण वरुटे ना या बैठकीला बोलवण्याचे प्रशासनाने पत्र न काढल्यामुळे पुन्हा बैठक लावली आणि १९ मे २०२२ रोजी वरुटे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत विज्ञान विषय शिक्षक पदोन्नती चा प्रश्न निकालात निघाला. वरुटे यांच्या रेट्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला. वरुटे हा प्रश्न तडीस नेऊन ग्रामविकास मंत्री यांच्या माध्यमातून मंत्रालयात बैठक घडवून आणली. या बैठकीला विशेष परिश्रम घेतलेले भुदरगड चे आमदार प्रकाश आबिटकर देखील उपस्थित होते.पदोन्नती च्या प्रतीक्षेत असलेले जिल्ह्यातील तमाम विज्ञान विषय शिक्षक बंधू यांच्या पदोन्नतीचा मार्ग रिकामा झाला. प्रमोशन घेतलेल्या शाळेत आज विज्ञान शिक्षक हजर झाले. याचे स सर्वस्वी श्रेय शिक्षक संघ व राजाराम वरुटे यांना जाते. या उपकाराची जाणीव ठेवून जिल्ह्यातील विज्ञान विषय शिक्षक कृती समितीने सध्या होऊ घातलेल्या शिक्षक बँकेच्या निवडणुकीत राजाराम वरुटे यांच्या शिक्षक संघाला बिनशर्त पाठिंबा देऊन ऋणातून उतराई होण्याचा निर्णय घेतला. यावेळी बोलताना विज्ञान विषय कृती समितीचे संजय रोगे म्हणाले, अडीच वर्ष प्रशासनाकडे हेलपाटे मारून जीव मेटाकुटीला आला होता, विज्ञान विषय शिक्षक पदोन्नती मुळे सध्या कार्यरत असलेल्या विषय शिक्षकांना अडचण होणार यामुळे अनेक संघटनांनी या प्रश्नातून काढता पाय घेतला होता, न्याय्य मार्गाचा लढा असतानादेखील केवळ शिक्षक बँकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक संघटनांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले, परंतु राजाराम वरुटे यांनी शिक्षकांच्या प्रश्नासाठी कधीच दुजाभाव केलेला नाही. हा प्रश्न न्याय आणि सनदशीर मार्गाचा असल्यामुळे त्यांनी या प्रश्नात लक्ष घातले, आणि आम्हाला न्याय मिळवून दिला म्हणून आम्ही संपूर्ण विज्ञान विषय शिक्षक या निवडणुकीत सर्व ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी राहण्याचा ठाम निश्चय केला आहे.

यावेळी श्रीकांत माणगावकर, सुनील गुरव, संजय रोगे, दस्तगीर फकीर, शिवाजी सूर्यवंशी,मारुती सोनाळकर, नितीन बागुल, भगवान मुंडे, बी.आर. कांबळे, संदीप माने, विनायक पुंडफळ, अशोक देसाई,सागर तेली, किशोर पाटील, गजानन पाटील, विशाल देसाई, अजित पाटील, भरत गुरव शरद दिवसे यांच्यासह दोनशेच्यावर विज्ञान विषय शिक्षक उपस्थित होते. यावेळी राजाराम वरुटे यांनी विज्ञान विषय शिक्षक कृती समितीचे अभिनंदन केले.

अनेकांना गहिवरून आले

दिवसभर शाळा करायची आणि रात्री ८ वाजेपर्यंत जिल्हा परिषदेत पाठपुरावा असा अडिच वर्षे संघर्ष सुरू होता. हा त्रास अनुभवलेले अनेक विज्ञान विषय आज आवर्जून उपस्थित होते. अशा अनेक शिक्षकांनी वरुटे यांच्या पुढे आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.यावेळी वातावरण भावुक झाले होते.