बहिरेश्वर : केंद्र सरकारने सुरु केलेली अग्निपथ योजना बेरोजगारी वाढवणारी असल्याने त्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसने आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली फुलेवाडी येथे आंदोलन केले.
यावेळी आमदार पी. एन. पाटील म्हणाले, इंग्रजांनी आपल्या देशावर दीडशे वर्षे राज्य केले. त्यांनाही महात्मा गांधी यांच्या नेतृत्वानेच देश सोडावा लागला तसाच या मोदी-शहांचीसुद्धा कॉंग्रेसच्या नेतृत्वालाच हकालपट्टी करावी लागणार आहे नाहीतर हे लोक देशाच खासगीकरण करून देश विकायला सुद्धा मागे पडणार नाहीत. युवकांना वयाच्या उमेदीत सैन्य भरती चार वर्षात सेवानिवृत्त करून त्यांना देशोधडीला लावायचा हा इरादा हाणून पाडण्यासाठी राहुल गांधी यांच्या आदेशानुसार आम्ही राज्यव्यापी आंदोलन करत आहोत.
गोकुळ दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे म्हणाले, अग्निपथ योजना निव्वळ तरूणांची दिशाभूल करणारी आहे. शिवाय केंद्र शासनाला संरक्षण खात्याचे खाजगीकरण करावयाचे आहे. या विरोधात कॉंग्रेस पक्ष आंदोलन करून थांबणार नाही तर ही योजनाच बंद करण्यासाठी आग्रही राहील.याप्रसंगी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल पाटील, कॉंग्रेसचे सरचिटणीस बाजीराव खाडे, कुंभी कासारी कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव पाटील, अमर पाटील, हिंदुराव चौगुले आदी नेतेमंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.