किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी गोकुळच्या शास्त्रोक्त मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा : संचालक नंदकुमार ढेंगे

गारगोटी (प्रतिनिधी) : दूध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जातिवंत म्हशींची गोठ्यातच पैदास करून त्यांचे गोकुळच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन करावे आणि त्यासाठी गोकुळच्या सर्व सेवा सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोकुळचे संचालक, भुदरगड पंचायत समितीचे माजी सभापती नंदकुमार ढेंगे यांनी केले.

‘गोकुळ’च्या म्हैस दूध वाढ व गुणवत्ता सुधार कार्यक्रमा अंतर्गत मडिलगे बुद्रुक (ता. भुदरगड) येथे आयोजित दूध संस्था संचालक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कलनाकवाडी येथील क्रांती दूध संस्थेचे चेअरमन शरदराव निंबाळकर हे होते.

स्वागत गोकुळचे विस्तार अधिकारी विक्रम पाटील यांनी केले. विस्तार अधिकारी भैरवनाथ घावरे यांनी प्रास्ताविक भाषणात गोकुळचा म्हैस दूध वाढ व गुणवत्ता सुधार कार्यक्रम आणि अनुदान योजनांची माहिती दिली.

याप्रसंगी गोकुळच्या आनंदराव पाटील चुयेकर प्रशिक्षण केंद्राचे मुख्य प्रशिक्षक एम. पी पाटील. यांनी जातिवंत दुधाळ जनावरांची निवड, त्यांचे संगोपन, आहार व्यवस्थापन आदी विषयावर शास्त्रोक्त पद्धतीने मार्गदर्शन केले.

गोकुळच्या महिला प्रशिक्षिका मृण्मयी सातवेकर यांनीही दूध व्यवसायातील महिलांचा सहभाग आणि योगदान याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास मोहन कळके, बाळासो कळेकर, नेताजी साळवी, शिवाजी चौगले यांच्यासह दूध संस्थांचे संचालक, कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत तांबेकर यांनी केले तर आभार गोकुळ चे सहाय्यक दूध संकलन अधिकारी आशिष पाटील यांनी मानले.