करवीर (प्रतिनिधी) : सन २००४ पासून शिक्षक बॅंकेत शिक्षक संघाची आजतागायत सत्ता आहे. सत्ताकाळात सत्तारुढ गटाने मनमानी कारभार करून सभासदांचा विश्वासघात केला. याकाळातील गैरखर्चाच्या विरोधात बँक बचाव कृती समितीच्या माध्यमातून सभासद हितासाठी सातत्याने विविधांगी मार्गांनी केलेल्या संघर्षामुळे शिक्षक बॅंक तोट्याच्या विळख्यातून बाजूला तर आलीच, शिवाय शाश्वत अशा विक्रमी नफ्यातही आली. आमच्या संघर्षातून शिक्षक बॅंकेला आलेल्या चांगल्या दिवसांची सभासदांना जाणीव आहे. यामुळेच तर या निवडणुकीत सभासद आम्हाला विजयाचा कौल देतील, अशी खात्री असल्याचा विश्वास ‘आप’लं पुरोगामी – समिती – संघ समविचारी परिवर्तन पॅनलचे प्रमुख प्रसाद पाटील यांनी व्यक्त केला. करवीर व पन्हाळा तालुका प्रचार दौऱ्याप्रसंगी प्रसाद पाटील बोलत होते.

प्रसाद पाटील म्हणाले, बॅंकेतील अवास्तव खर्च, मनमानी कारभाराबाबत सातत्याने आवाज उठविला. बॅंकेतील गैरव्यवहाराबाबत संचालकांविरूद्ध वसूलीची व बरखास्तीची कारवाई होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग २३ आंदोलन व तीन दिवस उपोषण केले. आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन केल्याने बॅंकेतील सत्ताधाऱ्यांच्या नसत्या उठाठेवी थांबल्या. गैरखर्चाला आळा बसला. बॅंकेत आम्ही सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर ठेवलेल्या अंकुशामुळे कर्जावरील व्याजदर १० टक्के पर्यंत खाली तर आलाच. शिवाय सभासदांना लाभांश तसेच व्याज मिळण्याचा मार्ग सुकर झाला. अनेक वर्षं लाभांपासून वंचित राहिलेल्या सभासदांना आमच्या संघर्षामुळे लाखो रूपये आर्थिक लाभ मिळू लागल्याने खूश असलेले सभासद आमच्या पॅनेलच्या पाठीशी असल्याने या निवडणुकीत आमचा विजय निश्चित आहे.
ते पुढे म्हणाले, आमच्या विचाराशी सहमत असलेले संघाच्या थोरात गटातील मातब्बर नेते सुरेश कांबळे, जयवंत पाटील, शिक्षक समितीचे मातब्बर नेते रवळू पाटील, विनायक चौगुले, विष्णू जाधव, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैजनाथ दराडे, शिक्षक सेनेचे नेते मनोजकुमार रणदिवे, डीसीपीएसचे पुणे विभागीय अध्यक्ष तुषार पाटील यांनी आमच्या पॅनेलला दिलेल्या जाहीर पाठिंब्यामुळे पँनेलची ताकद वाढली असून सभासद आमच्या पँनेलला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असा विश्वास प्रसाद पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी ‘आप’लं पुरोगामी समिती-संघ समविचारी परिवर्तन पॅनेलच्या प्रचारार्थ करवीर व पन्हाळा तालुक्यातील प्रचार दौऱ्यात पॅनेल प्रमुख प्रसाद पाटील, महिला उमेदवार शारदा वाडकर, पी. आर. पाटील, शशी पोवार, मनिषा गुरव, अर्चना कोरवी, निर्मला तिगाडे, भारती चोपडे, अनिल जाधव, सुभाष केरिपाळे तसेच सभासद बंधू भगिनीं उपस्थित होते.
