शिवसेनेवरील ‘वार’, पलटवणार ‘पवार’

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यात सत्तास्थापनेचा मुहूर्त शोधला जात असतानांच यात राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दमदार एन्ट्री केली आहे. ते ॲक्शन मोडमध्ये आल्याने शिवसेनेवर झालेला ‘वार’ पलटवणार शरद पवार अशी चर्चा सुरु झाली आहे.

२०१९ साली अजित पवार यांनी भाजपबरोबर जात अजित पवार यांनी बंड केले होते. शरद पवार यांनी कुशलतेने हे प्रकरण हाताळत अजित पवार यांचे बंड मोडून काढले होते. आता तसेच एकनाथ शिंदेंनी बंडाळी केली आहे. या बंडाळीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हतबल झाल्याचे चित्र होते. मात्र महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार असणाऱ्या शरद पवार यांच्या एन्ट्रीमुळे सत्तास्थापनेचा मुहूर्त कायदेशीर प्रक्रियेमध्ये अडकणार आहे. कालच शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हतबल होऊ नका, असा सल्ला दिला होता. तर बंडखोर आमदारांनाही सूचक इशारा दिला होता. त्यातच आज शिवसेना विधीमंडळ गट नेता पदावर अजय चौधरी यांना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांना सत्ता स्थापनेसाठी संघर्ष करावा लागणार आहे. तसेच सत्ता स्थापनेसाठी त्यांना महाराष्ट्रात यावे लागणार आहे, असा इशारा दिला होता. त्याचे परिणाम आज मुंबईत दिसू लागले आहेत. आज शिवसैनिकांनी आमदार सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर यांचे पोस्टर फाडून संपर्क कार्यालयावर हल्ला केला.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकाराशी बोलताना शरद यांच्या मार्गदर्शनाखाली रणनिती आखली जाईल, असे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यात मातोश्रीमध्ये बैठक झाली. यावेळी बंड कसे मोडून काढायचे यावर सविस्तरपणे चर्चा झाली. या भेटीवेळी मातोश्रीबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले होते. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांचे बंड मोडून काढत शिवसेनेवरील झालेला ‘वार’, शरद पवार पलटवणार का? आणि सरकार वाचवणार का?, अशी चर्चा सुरु झाली आहे.