गडहिंग्लज (प्रतिनिधी) : प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत सत्तारुढ राजाराम वरुटे यांच्या गटाला खिंडार पडले आहे. सत्तारूढ गटाचे व बँकेचे माजी चेअरमन अण्णासाहेब शिरगावे, बँकेचे माजी संचालक सुभाष निकम, तालुका सरचिटणीस गणपतराव पाथरवट यांनी आपल्या समर्थक शिक्षकांसह थोरात गटात प्रवेश करून शिक्षक बँकेच्या निवडणुकीत राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीला पाठिंबा जाहीर केला.
प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी राजषी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीच्या प्रचारासाठी गडहिंग्लज येथे जाहीर मेळावा झाला. यावेळी शिरगावे, निकम, पाथरवट यांनी थोरात गटात प्रवेश केला.
गडहिंग्लज तालुक्यात वरुटे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. शिक्षक बँकेला स्वतःची जहागिरी समजून हुकूमशाही व एकाधिकारशाही पद्धतीने कारभार करणाऱ्या नेतृत्वाला कंटाळून आम्ही हा निर्णय घेतल्याचे शिरगावे यांनी सांगितले. शिक्षक बँक ही सामान्य सभासदांची आहे. पण, स्वतःला बँकेचे मालक समजून बँकेचा वापर स्वतःसाठी व बगलबच्चांसाठी केला गेला. बँकेतील चुकीच्या कारभारावर बोलल्यावर दडपशाहीचा वापर करून दाबण्याचा प्रयत्न केला गेला. या अपप्रवृत्तीला विरोध करण्यासाठीच आम्ही हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवी पाटील म्हणाले, शिक्षक बँकेतील सत्तारूढ पॅनेलच्या नेत्यांच्या एकाधिकारशाही, हुकूमशाही दडपशाहीला कंटाळून माजी चेअरमन व विद्यमान संचालक अण्णासाहेब शिरगावे व त्यांच्या सर्व समर्थकांनी घेतलेला हा निर्णय शिक्षक बँकेतील परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. शिक्षक बँकेची होऊ घातलेली ही निवडणूक सभासदांच्या स्वाभिमानाची बनलेली आहे. शाहू आघाडीला सभासदांचा पाठिंबा वाढत आहे. ही निवडणूक सभासदांनी आपल्या हातात घेतलेली आहे. सत्ताधार्यांच्या भ्रष्ट कारभाराविरुद्धचा हा सभासदांचा स्वाभिमानी आक्रोश आहे. ये तो बस ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है. हळूहळू सत्ताधारी गटातील अनेक नेते या आघाडीला पाठिंबा देणार असून या सर्वांच्या पाठिंब्यावर शिक्षक बँकेमध्ये परिवर्तन अटळ आहे.
यावेळी शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील, जिल्हा नेते रघुनाथ खोत, मधुकर येसणे, पी. सी. पाटील, पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब वालीकर, व्हाईस चेअरमन अनिल बागडी, शिक्षक समितीचे सतीश तेली, संजय चाळक, नामदेव पाटील, डीसीपीएसचे निनाद पाटील, शिक्षक भारतीचे बसवराज अंकली, कास्ट्राईबचे भीमराव तराळ, मधुकर तराळ, उर्दू शिक्षक संघटनेचे फैय्याज तहसीलदार, महिला आघाडीच्या वंदना दळवी यांच्यासह राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.