सभासद नसणाऱ्यांना शिक्षक बँकेविषयी बोलण्याचा काय अधिकार? : प्रसाद पाटील

राधानगरी : सत्तारूढ पँनेलचे नेतृत्व करणारे नेते हे शिक्षक बँकेचे सभासद तर नाहीत आणि ते सलग सहा वर्षे बँकेचे चेअरमन असताना बँक तोट्यात घालवून आता त्यांना बँकेविषयी बोलायचा काय अधिकार आहे, असा सवाल ‘आप’लं पुरोगामी-समिती-संघ समविचारी परिवर्तन पँनेलचे प्रमुख प्रसाद पाटील यांनी केला.

प्रसाद पाटील यांनी आज राधानगरी तालुक्यात ‘आप’लं पुरोगामी-समिती-संघ समविचारी परिवर्तन पँनेलच्या प्रचारासाठी दौरा केला. याप्रसंगी त्यांनी तालुक्यातील विविध शाळांना भेटी देत पँनेलची भूमिका शिक्षक सभासदांना पटवून दिली.

यावेळी प्रसाद पाटील म्हणाले, त्यांनी बॅंक नफ्यात चालवली असती तर त्यांचा सल्ला, नेतृत्व माननं ठिक होतं, बॅंक तोट्यात घालवून नेतृत्व करणारे नवीन संचालकांना कोणता सल्ला देतील हे न कळण्याइतके सभासद दूधखुळे राहिलेले नाहीत.     दुसऱ्या विरोधी पँनैलचा स्वाभिमान इतका जागृत झाला की दोन वर्षे वाटाघाटी होऊनही जागा वाटपात वादावादी झाली. निवडणकीपूर्वी इतकी वादावादी असेल तर निवडून आल्यावर हे लोक काय करणार हे वेगळे सांगायला नको.

    निवडणूक काळात भूलथापा मारून सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या मंडळीकडून सातत्याने होत आला आहे. सभासदांनी आता कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता सर्वसमावेशक ‘आप’लं पुरोगामी-समिती-संघ समविचारी परिवर्तन पँनेलच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

सभासद हितासाठी आपल्या नेतृत्वाखालील संघर्ष व आपले शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कार्य आम्ही जवळून अनुभवले असून आमचा पाठिंबा आपल्या परिवर्तन पँनेललाच असल्याचे अनेक सभासदांनी सांगितले.

      या प्रचार दोऱ्यात महिला उमेदवार शारदा वाडकर, राधानगरीचे उमेदवार सर्जेराव ढेरे यांच्यासह प्रचार प्रमुख तुषार पाटील, बळवंत गुरव, मनिषा गुरव, साधना पाटील, शशिकांत पोवार, रंगराव वाडकर आदी शिलेदार सहभागी उपस्थित होते.

सभासदांच्या डोक्यावर छत्री धरून प्रचाराचा शुभारंभ

भ्रष्टाचाराचा ऊन पाऊस रोखणारी छत्री… वीस वर्षे बॅंक बचावासाठी कार्यरत असलेली छत्री.. शिक्षकांच्या डोक्यावर छाया धरणारी छत्री… हे निवडणूक चिन्ह असल्याने छत्री सभासदांच्या डोक्यावर धरून भपका न करता अनोख्या पध्दतीने पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.