नवी दिल्ली : उमेदवाराला एकाच वेळी दोन जागी निवडणूक लढवण्यास बंदी घाला, असे आवाहन निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला केले आहे. यासाठी कायद्यात बदल करावा, असे आयोगाने सुचवले आहे. उमेदवार असे करायला तयार नसल्यास एक मतदारसंघ रिकामा करावा आणि पोटनिवडणूक लावणाऱ्यांवर मोठा दंड आकारावा, असे आयोगाने सुचवले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी संबंधित कायद्यात बदल करण्याबाबत प्रस्ताव ठेवला आहे. सध्या उमेदवाराला निवडणुकीत दोन वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची परवानगी आहे. दोन्ही मतदारसंघातून विजयी झाल्यास उमेदवार केवळ एकाच ठिकाणी आपली जागा ठेवू शकतो. दुसऱ्या जागेवरून त्याला राजीनामा द्यावा लागतो. १९९६ मध्ये लोकप्रतिनिधी अधिनियमात संशोधन केले गेले. त्यात दोनपेक्षा अधिक जागी उमेदवाराला निवडणूक लढवण्यापासून रोखण्यात यावे, अशी शिफारस करण्यात आली. निवडणूक समितीच्या म्हणण्यानुसार, याबाबतच्या दंडाच्या रकमेत बदल केले पाहिजेत. जेव्हा उमेदवार दोनपैकी एक जागा रिकामी करतो. तेव्हा रिकाम्या केलेल्या जागेवर पोटनिवडणूक घ्यायला सरकारी खजिन्यातून निधी व अन्य संसाधनांवर खर्च करावा लागतो. तसेच तेथील मतदारांवर अन्याय होतो ज्यांनी त्याला मतदान केले आहे. विधि आयोगाने निवडणूक आयोगाच्या या प्रस्तावाला समर्थन दिले आहे. मात्र, विधि आयोगाने पोटनिवडणुकीसाठी केल्या जाणाऱ्या खर्चाची रक्कम जमा करण्याचा प्रस्ताव रद्द केला आहे.