मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महाविकास आणि विरोधी भाजप यांच्यात मोठी चुरस निर्माण झाली आहे. १० जागांसाठी भाजपकडून सहा तर महाविकास आघाडीकडून पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेना सोडल्यास राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपला मतांची गरज आहे. मात्र मतांची संख्या जुळवाजुळवीसाठी महाविकास आघाडीमध्येच फोडाफोडी सुरु झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांशी संपर्क साधण्यात येत आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये अपक्ष आमदारांची पळवापळवी सुरु झाली आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा जोरदार रंगू लागली आहे. अपक्ष आणि लहान पक्षांशी वेगवेगळा संपर्क सांधण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक, काँग्रेसचा एक उमेदवार विजयी होणार असे निश्चित आहे. परंतु दोन्ही पक्षातील प्रत्येकी दुसरा उमेदवार जिंकवण्यासाठी अतिरिक्त मतांची गरज आहे. या मतांची पुर्तता करण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून प्रयत्न सुरु झाले आहेत.
निवडणूक २० जून रोजी होणार आहे. अवघ्या तीन दिवसांवर निवडणूक असल्यामुळे राज्यातील घडामोडींना वेग येताना दिसत आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अपक्ष आमदारांच्या भेटी घेत आहेत. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांची भाई जगताप आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी भेट घेतली आहे. त्यांच्याकडील ३ आमदारांची मते मिळवण्यासाठी हा प्रयत्न सुरु झाला आहे.
विधान परिषदेसाठी उमेदवारांनी अपक्ष आमदारांच्या भेटीगाठी घेण्याचे सत्र सुरु केले आहे. आपली जागा सुरक्षित करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रयत्न करत आहेत. राज्यसभा निवडणुकीमध्येही हितेंद्र ठाकूर यांची महाविकास आघाडीतील नेत्यांनी भेट घेतली होती. यानंतर आता पुन्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली आहे.