लोकनगरी गृह प्रकल्पाला केंद्रीय राज्यमंत्र्यांची सदिच्छा भेट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री आवास योजनेंर्गत बांधलेल्या व केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाकडून ‘गुणवत्ता प्रमाणपत्र (सर्टिफिकेट ऑफ मेरिट) २०२२’ पुरस्कार मिळालेल्या रामसिना ग्रुपच्या नागाळा पार्क येथील लोकनगरी गृहप्रकल्पाला केंद्रीय रेल्वे व टेक्सटाइल्स राज्य मंत्री दर्शना जरदोश यांनी  सदिच्छा भेट दिली.

यावेळी मंत्री जरदोश यांनी ट्विट करत ‘अब’अपने घर का सपना हुआ पुरा’अशा शब्दांत या गृहप्रकल्पाविषयी गौरवोद्गार काढले आहेत. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘राज्यसभेचे नूतन खासदार धनंजय महाडिक व अधिकाऱ्यांच्यासोबत कोल्हापुरातील नागाळा पार्क येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधलेल्या ‘लोकनगरी’ गृहप्रकल्पला भेट दिली. येथील नागरिकांशी, लाभार्थ्यांशी संवाद साधला. त्यांचे सुखद अनुभव ऐकून मनस्वी आनंद झाला.’

याप्रसंगी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे, उपशहर अभियंता नारायण भोसले आदी उपस्थित होते. या भेटीत मंत्री जरदोश यांनी या प्रकल्पातंर्गत वैशिष्ट्यपूर्णबाबींचे कौतुक केले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधलेल्या निवडक गृहप्रकल्पांना गुणवत्ता प्रमाणपत्र (सर्टिफिकेट ऑफ मेरिट) प्रदान केले जाते. रामसिना ग्रुपचे विकेश ओसवाल यांनी गृहप्रकल्पाची वेगवेगळी वैशिष्ट्ये सांगितली. तसेच केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाकडून ‘गुणवत्ता प्रमाणपत्र’पुरस्कार मिळाल्याचे सांगितले. या गृहप्रकल्पात एकूण २५० सदनिका आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातून पुरस्कारासाठी हा एकमेव प्रकल्प निवडल्याचे त्यांनी सांगताच मंत्र्यांनी रामसिना ग्रुपचे कौतुक केले. नागरिकांना आवश्यक सेवा सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करुन दिल्याबद्दल मंत्र्यांनी रामसिना ग्रुपच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. याप्रसंगी अमित शहा, हरिता राठोड, रामसिना ग्रुपचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.