आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळच्या चार हजार ७०० विशेष गाड्या

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाच्या सुमारे ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केली.

परब म्हणाले,  दिनांक  ६ जुलै ते १४ जुलै, २०२२ दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहोळ्यासाठी दि. ८ जुलै रोजी २०० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात्रेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती येथून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून पंढरपूर येथे जाणारे वारकरी तसेच भक्तांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही परब यांनी केले.

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पूर्ती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा  काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक… अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पंढरपूर येथे यात्रेसाठी येणाऱ्या व जाणाऱ्या भाविकांसाठी पुढीलप्रमाणे बस स्थानके व जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. बस स्थानक आणि जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बसेसखालील प्रमाणे

१.  चंद्रभागा बसस्थानक –   मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर आगार

२.  भिमा यात्रा देगाव  –   औरंगाबाद, नागपूर व अमरावती प्रदेश

३.  विठ्ठल कारखाना    –   नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर

४.  पांडुरंग बसस्थानक –   सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग

.