नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या १४ जून रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान ते जलभूषण भवन, मुंबईतील क्रांतिकारक दालन आणि पुण्यातील जगतगुरू श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचे उद्घाटन करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, १४ जूनला महाराष्ट्राच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर येणार आहेत. देहूच्या जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. राजस्थानातून मागवण्यात आलेल्या विशिष्ट प्रकारच्या काळ्या पाषाणापासून या शिळा मंदिराची उभारणी करण्यात आली असून शिळेसमोरच सुमारे अडीच फूट उंचीचा संत तुकाराम महाराजांचा पुतळाही बसवण्यात आला आहे.
या शिळेवर बसूनच तुकाराम महाराज कीर्तन करत होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. देऊळ वाडा म्हणूनही हा परिसर ओळखला जातो. तुकोबांच्या पहिल्या पत्नी जिजाबाई यांच्या स्मृती प्रित्यर्थ इथं एका तुळशी वृंदावनाचीही स्थापना करण्यात आली आहे. नवीन शिळा मंदिर ४२ फूट उंचीचं असून याचं बांधकाम हेमाडपंथी पद्धतीनं करण्यात आलं आहे. गेल्या ६ वर्षांपासून या मंदिराच्या उभारणीचं काम सुरु होतं; यासाठी १ कोटी १७ लाख रुपये खर्च आल्याचं देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी आकाशवाणीला सांगितलं. यानंतर मुंबईमध्ये जल भूषण इमारत आणि राज भवनातील क्रांतिकारक दालनाचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
“जल भूषण” हे १८८५ पासून महाराष्ट्राच्या राज्यपालांचं अधिकृत निवासस्थान आहे. या इमारतीचं आयुर्मान संपल्यामुळे ती पाडली होती. त्यानंतर ऑगस्ट २०१९ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते या नव्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली होती. या नव्यानं उभारलेल्या इमारतीचं उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. राजभवनात २०१६ मध्ये सापडलेल्या भुयाराला नवं रूप देत तिथे महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ एक संग्रहालय बनवण्यात आलं आहे. या संग्रहालयाचं उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते होणार आहे