विधान परिषदेला कॉंग्रेस अडचणीत; आघाडीतील ‘या’ पक्षाचा सवतासुभा !

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा झालेला दारुण पराभव मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीतही दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला एकला चलोचा इशारा दिला आहे.

संजय पवार यांच्या पराभवाचे खापर संजय राऊत यांनी अपक्षांवर फोडल्याने महाविकास आघाडीला पाठिंबा देणार्‍या अपक्षांमध्ये प्रचंड नाराजी आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोन करून मविआला मतदान करण्याचे आवाहन करूनही बविआचे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील यांनी थेट भाजपच्या पारड्यात मत टाकले, तर शेकापचे श्यामसुंदर शिंदे, करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे आणि मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी पहिल्या पसंतीचे मत जरी संजय पवार यांना टाकले असले तरी तिसर्‍या पसंतीचे मत धनंजय महाडिक यांना दिल्यानेच त्यांचा विजय झाला, असे शिवसेनेला वाटत आहे. महत्त्वाचे म्हणजे हे तिन्ही आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात. शिवाय राष्ट्रवादी आणि काँग्रेसने ऐनवेळी मतांचा कोटा वाढवल्याने शिवसेनेला किमान 2 मतांचा फटका बसल्याची भावना आहे. त्यामुळे एकप्रकारे शिवसेनेने राष्ट्रवादीलाच इशारा दिल्याचे म्हटले जात आहे. येत्या 20 जून रोजी विधान परिषदेच्या 10 जागांसाठी ही लढत होत आहे. या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी 2 जागांवर उमेदवार उतरवत असून भाजप 5 उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे. निवडणुकीत विजयासाठी आवश्यक 27 मतांच्या कोट्यानुसार शिवसेनेचे दोन्ही उमेदवार सहज निवडून येऊ शकतात, परंतु राष्ट्रवादी आणि प्रामुख्याने काँग्रेसला अतिरिक्त मतांची आवश्यकता असल्याने शिवसेनेच्या भूमिकेमुळे या दोन पक्षांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

🤙 9921334545