मुंबई : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व खा. राहुल गांधी यांच्याविरोधात केंद्रातील भाजपा सरकार राजकीय सुडबुद्धीने वागत आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा सर्रास गैरवापर केला जात असून त्याचाच एक भाग म्हणून खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठीच सोनिया व राहुल यांना ईडीने नोटीस बजावली आहे. भाजपा सरकारच्या या हुकूमशाही वृत्तीचा विरोध करण्यासाठी १३ जूनला मुंबई आणि नागपूर येथील ईडीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार हे लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवून काम करत आहे. सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स, एनसीबी यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांना मोदी सरकारने कळसुत्री बाहुल्या बनवले असून विरोधकांना नामोहरण करण्यासाठी त्यांचा गैरवापर केला जात आहे. देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या घरावर धाडी टाकल्या जात आहेत, त्यांच्यावरच कारवाई केली जात आहे. काँग्रेस पक्ष सातत्याने भाजपाच्या जुलमी, अत्याचारी व मनमानी कारभाराच्या विरोधात आवाज उठवत आला आहे. तीन काळे कृषी कायदे, महागाई, बेरोजगारीच्या मुद्यावर भाजपा सरकारला काँग्रेसने रस्त्यावर उतरूनही जाब विचारला आहे. नुकतेच उदयपूर येथे काँग्रेस पक्षाचे नवसंकल्प शिबीर पार पडले या शिबिरातील काँग्रेस पक्षाचा उत्साह पाहून भाजपाला धडकी भरली असून आमच्या नेत्यांवर दबाव आणण्यासाठी खोटे प्रकरण रचून ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. भाजपा सरकारच्या या कटकारस्थानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्ष सोमवार १३ जून रोजी ईडीच्या कार्यासमोर धरणे आंदोलन करणार आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या पाठीशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस खंबीरपणे उभी असून आम्ही मोदी सरकारच्या दडपशाहीला भिक घालणार नाही असे पटोले म्हणाले.