मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवल्याने अनेकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. काहींचे चेहरे पडले आहेत, काही लोकं तर बावचळले तर काही पिसाटले आहेत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर आज मुंबईतील पक्ष कार्यालयात भाजपने विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी फडणवीस यांनी केलेल्या भाषणात सरकारवर जोरदार टीका केली.
फडणवीस म्हणाले, “आपण जिंकले आहोत. जिंकलेल्यानी नम्रता न सोडता आनंद करायचा असतो, उन्माद करायचा नसो, त्यामुळे त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करुया. काही लोकं सांगतायत की, कोणामुळे हे जिंकले? त्यांना जर खरचं माहिती असेल तरी ते काहीच करू शकणार नाहीत. याचं कारण त्यांच सरकार त्यांना टिकवणं महत्वाच आहे. म्हणून आपल्याला ज्यांनी मदत केली, त्यांच्यावर हे जर कारवाई करायला निघाले तर ते निघूनच जातील, पण जे च्या दबावाखाली मदत करु शकले नाही, पण मनाने आपल्यासोबत राहिले तेही निघून जातील. असा दावा देखील फडणवीसांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. आम्ही जिंकलो ते हरले इथपर्यंत हा विषय मर्यादित नाही. पण महाराष्ट्र थांबलाय, महाराष्ट्राचा विकास थांबला आहे. या सर्व अंतरविरोधाच्या अंतर्गत केवळ आमचं लढायचं म्हणून आमच्या काळात सुरु झालेले सर्व प्रकल्प थांबवून महाराष्ट्राचे मोठे नुकसान महाविकास आघाडीमुळे सुरु आहे.