मुंबई : भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठीही ऐनवेळी सहावा उमेदवार देत निवडणुकीत राजकीय चुरस निर्माण केली आहे. या सहाव्या जागेसाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना भाजपचं समर्थन असणार आहे.

दरम्यान पाच अधिकृत आणि एक अपक्ष अशा सहा जागांसाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्न करणार आहे. प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. उमा खापरे आणि सदाभाऊ खोत यांच्या उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.
पाटील म्हणाले, सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांमधले एक लोकप्रिय नेतृत्व आहे. एसटी कर्मचारी संपामध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. शेतकरी तसेच अनेक मुद्यावर ते आवाज उठवत असतात. त्यांना आमदार मतदान करतील. भाजपचे पाच आणि अपक्ष एक असे सर्व सहा उमेदवार निवडून येतील. महाविकास आघाडीतील आमदार देखील सदाभाऊंना मत देतील.