विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांची नावे जाहीर; भाजपकडून सहावा उमेदवार

मुंबई : राज्यात एकीकडे राज्यसभा निवडणुकीवरून नाट्यमय घडामोडी घडत असताना, दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीतही रंगत येणार आहे. राष्ट्रवादीकडून दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. तर भाजपने काल पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. आज सहावा उमेदवाराची घोषणा केली आहे.

राज्यात येत्या २० जूनला विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकनाथ खडसे, रामराजे नाईक- निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हे दोघेही आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपला रामराम ठोकून एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीकडून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात येत आहे.

भाजपकडून विधान परिषदेसाठी सहावा उमेदवार म्हणून सदाभाऊ खोत यांच्या नावाची घोषणा केली आहे. सदाभाऊ खोत हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. खोत मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ते अर्ज भरणार आहेत. भाजपकडून विधान परिषदेसाठी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर शिवेसनेकडून सचिन आहिर आणि आमश्या पाडवी यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना संधी देण्यात आली आहे.