मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना उमेदवारी जाहीर केली.

चंद्रकांत हंडोरे हे भीमशक्ती संघटनेचे नेते आहेत. त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. आता त्यांना काँग्रेसकडून विधान परिषदेची संधी मिळाली आहे. हंडोरे हे मुंबईतील चेंबूर मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते राज्य उपाध्यक्ष आहेत. ते मुळचे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील माले येथील आहेत.
भाई जगताप हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. काँग्रेसचा आक्रमक चेहरा म्हणून ते ओळखले जातात. येत्या महापालिका निवडणुकीआधीच काँग्रेसने भाई जगताप यांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसनं उमेदवारांची निवड करताना दोन्ही नेते मुंबईतीलच निवडले असून हे दोन्ही उमेदवार आजच अर्ज भरणार आहेत. विधान परिषदेसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे. दरम्यान, सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह सुभाष देसाई, दिवाकर रावते (शिवसेना), प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड, विनायक मेटे, सुजितसिंह ठाकूर, आर. एस. सिंह (सर्व भाजप), संजय दौंड (राष्ट्रवादी) हे दहा सदस्य निवृत्त होणार आहेत.
