जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीस ३ कोटी ४० लाख नफा : चेअरमन राजीव परीट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीला या आर्थिक वर्षात ३ कोटी ४० लाख रुपयांचा विक्रमी नफा झाला आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन राजीव परीट यांनी दिली. तसेच सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. १२) होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

     परीट म्हणाले,  जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीने सभासदहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. एक जून २०२२ पासून कर्जावरील व्याजदरात अर्धा टक्के कपातीचा निर्णय अमलात आणला आहे. २०२१-२०२२ या वर्षासाठी सभासदांना १२.५० टक्क्याप्रमाणे १ कोटी ३९ लाख डिव्हिडंड देण्याची शिफारस, कायम ठेवीवर १० टक्क्याप्रमाणे १ कोटी १५ लाख व्याज देण्याचा निर्णय घेतले आहेत. वर्गणी ठेवीवर ९ टक्क्याप्रमाणे ९५ लाख व्याज देण्याचा निर्णय झाला आहे. कर्जावरील व्याजदर ०.५० टक्के कमी करुन तो ९.५० टक्के करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या, तसेच चार व त्यापेक्षा कमी हप्ते थकबाकी असणाऱ्या सभासदांच्या नियमित कर्जावर २०२१ २०२२ वर्षासाठी ०.५० टक्के व्याज रिबेट देणेचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे. व्याज रिबेटची रक्कम ५६ लाख रुपयेइतकी आहे. सभासद संख्या तीन हजार २६६ असून भाग भांडवल ११ कोटी १० लाख इतके तर १४२ कोटी ३३ लाखा ठेवी असल्याचेही परीट यांनी सांगितले.