घोडेबाजार शब्दावर अपक्ष आमदार संतप्त

चंद्रपूर : राज्यसभा निवडणुकीचे वातावरण तापले असून घोडेबाजाराची चर्चा सुरु असून या घोडेबाजार शब्दावर एका अपक्ष आमदाराने आक्षेप घेतला आहे. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार या शब्दावरुन संतप्त झाले आहेत.

याबाबत आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, घोडेबाजार या शब्दावर माझा आक्षेप आहे. पुरोगामी साडेबारा कोटी लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सभागृहाचे आम्ही सन्माननीय सदस्य आहोत. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या सदस्यांच्या बाबतीत शंका उपस्थित करणे चूक आहे. कोणताही राजकीय पक्ष आणि मोठे नेते मागे नसताना आम्ही निवडून सभागृहात जातो. केवळ जनतेच्या आशीर्वादामुळे, जनतेच्या प्रेमामुळे आम्ही लोकांच्या हिताचे कायदे करण्यासाठी, त्यांची कामे करण्यासाठी त्या सभागृहात निवडून जातो. राज्यसभा, विधान परिषद निवडणुका आल्या की, घोडेबाजार-घोडेबाजार सतत म्हणून मतदारसंघात आमची प्रतिमा मलिन करण्याचे काम केले जाते. पण आता आम्ही हे खपवून घेणार नाही. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे यासंदर्भात लेखी तक्रार देणार आहे. शिवसेनेच्या काही ज्येष्ठ नेत्यांकडूनही वारंवार घोडेबाजाराचा उल्लेख केला गेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही याबाबत सांगणार आहे.