दारूची होम डिलिव्हरी बंद !

मुंबई : कोरोनाची परिस्थिती निवळली आहे. आता महाराष्ट्रात दारूची होम डिलिव्हरी सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. गृह विभागाने उत्पादन शुल्क विभागाला पत्र लिहून याबाबत सूचना दिल्या होत्या.

अजित पवार यांनी म्हटले आहे की, कोविडचे प्रमाण कमी असल्याने आम्ही दारूची होम डिलिव्हरी बंद करत आहोत. लॉकडाऊनच्या काळात ही व्यवस्था होती. राज्याच्या गृह विभागाने महाराष्ट्र उत्पादन शुल्क आयुक्तांना पत्र लिहून आता दारूची होम डिलिव्हरी बंद करण्याबाबत सूचना केली होती. गृह विभागाचे म्हणणे आहे की, लॉकडाऊनदरम्यान सोशल डिस्टन्सिंग सुनिश्चित करण्यासाठी होम डिलिव्हरी प्रणाली लागू करण्यात आली होती. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर दारूची होम डिलिव्हरी सुरू करण्यात आली होती. मात्र, ही डिलिव्हरी परवानाधारक दुकानांसाठी होती. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आता केसेस कमी झाल्यामुळे सरकारने होम डिलिव्हरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.