कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने विधवा प्रथा बंद करण्याबाबत सर्व ३५ ग्रामपंचायतीमध्ये ठराव करणारा दक्षिण विधानसभा मतदारसंघ राज्यातील पहिला मतदारसंघ ठरला आहे. या मतदारसंघाचे आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारसंघातील ३५ ग्रामपंचायतीनी अनिष्ठ प्रथा/रूढी (विधवा प्रथा) बंद करण्याचा संकल्प करून तसा ठराव मंजूर केला आहे.
हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन कोल्हापूर दक्षिण मतदासंघातील सर्व ग्रामपंचायतींनी असा निर्णय घेऊन राज्यासमोर आदर्श निर्माण करावा असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या आढावा बैठकीत केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील उचगाव, गांधीनगर, सरनोबतवाडी, गडमूडशिंगी, वळीवडे, वसगडे, सांगवडे, चिंचवाड, सांगवडेवाडी, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, तामगाव, कणेरी, नेर्ली, हलसवडे, कणेरीवाडी, कळंबे तर्फ ठाणे, मोरेवाडी, कंदलगाव, हणबरवाडी, पाचगाव, दिंडनेर्ली, इस्पुर्ली, नंदगाव, गिरगाव, द. वडगाव-वड्डटवाडी, कोगील बुद्रुक, कोगील खुर्द, निगवे खालसा, वडकशिवाले, खेबवडे, चुये, नागांव व कावणे या ग्रामपंचायतिनी विधवा प्रथा बंदीचा ठराव केला आहे.
अभिमानास्पद व आदर्शवत निर्णय
आपण केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर करणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींचे अभिनंदन करतो. माझ्या मतदार संघातील सर्व ग्रामपंचायतीनी राजर्षी शाहू छत्रपतींच्या स्मृती शताब्दी वर्षात त्यांच्या विचारांचा जागर करत स्त्री समानतेसाठी ठोस पाऊले उचलली आहेत. या सर्व ग्रामपंचायतीनी घेतलेला निर्णय हा अतिशय अभिमानास्पद व आदर्शवत आहे.
ऋतुराज संजय पाटील
(आमदार, कोल्हापूर दक्षिण)