हनुमान चालिसावरून पुन्हा राजकारण तापणार; राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादीत पुन्हा वादाची शक्यता

नागपूर : खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा आज नागपुरातील रामनगरच्या प्रसिद्ध मंदिरात हनुमान चालीसा पठण आणि आरती करणार आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसही त्याच ठिकाणी हनुमान चालीसाचे पठण करणार असून नागपूर पोलिसांनी त्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादीत हनुमान चालिसावरून पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

राणा दाम्पत्याने विमानतळ ते रामनगरपर्यंत बाइक रॅलीसाठी परवानगी मागितली होती. या बाईक रॅलीला पोलिसांनी नाकारली असून, हनुमान चालीसाला अटींसह परवानगी दिली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याला राणा दाम्पत्य जबाबदार असेल, असेही या अटीत म्हटले आहे.

तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सुमारे एक हजार कार्यकर्ते रामनगर येथील मंदिरात दुपारी हनुमान चालिसा पठणासह रामायणाच्या सुंदरकांडाचे पठण करणार आहे. यावेळी त्यांनी राणा दाम्पत्याला आव्हान देताना ते म्हटले की, पुस्तकाशिवाय हनुमान चालीसा पाठ करा आणि दाखवा.

राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेला हा वाद आज आमनेसामने पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर या दोघांनाही लाऊडस्पीकरचा वापर करू देणार नसल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.