मुंबई : राज्यसभेच्या अपक्ष उमेदवारीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा झाली होती. अपक्ष उमेदवारीबाबत ड्राफ्टही तयार करण्यात आला होता. मात्र, अचानक माझाच कार्यकर्ता संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली, याबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त करत घोडेबाजार टाळण्यासाठी मी राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही, पण ही माझी माघार नसून, स्वाभिमान असल्याचे सांगितले.

राज्यसभेच्या उमेदवारीवरून आज छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. जनता हीच माझी खरी ताकद आहे. यापुढे माझ्या स्वराज्य संघटनेला मी बळकट करणार आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आणि विस्थापित मावळा संघटीत करणार, असा निर्धार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.
संभाजीराजे म्हणाले, राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढची वाटचाल कशी असणार अशी चर्चा होती. त्यावेळी मी दोन राजकीय निर्णय जाहीर केले होते. त्यावेळी मी बोललो होतो की राज्यसभा निवडणूक लढवणार आहे. पुढचा प्रवास किती खडतर आहे हे मला माहिती होते. मागील १५ ते २० वर्षे मी काम करतो आहे. खासदारकी असताना समाजाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न मी करत होतो. त्यामुळेच माझी इच्छा होती की सर्व पक्षांनी मिळून मला राज्यसभेत पाठवावं. मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की, शिवाजी महाराज यांचं स्मारक असेल तिथं आपण दोघांनी जायचं आणि संभाजीराजे खोटं बोलतायत का हे सांगायच. कोल्हापूरला जाताना मी बातम्या पहिल्या की कोल्हापूरच्या एका व्यक्तीला उमेदवारी दिली. संभाजीराजे शिवबंधन बांधणार अशा बातम्या दिल्या गेल्या. त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांना फोन केला, परंतु त्यांनी फोन उचलला नाही. त्यांनी शब्द पाळला नाही, असेही संभाजीराजे म्हणाले.