मुंबई : संभाजीराजे छत्रपती राज्यसभेची लढाई करणार की माघारी फिरणार हे आता उद्या स्पष्ट होणार आहे. उद्या, शुक्रवारी सकाळी ११ वाजता संभाजीराजे मुंबईतील मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
संभाजीराजे छत्रपतींनी आपण राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर त्यांनी सहाव्या जागेसाठी शिवसनेनेने आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. शिवसेनेने त्यांना पक्षप्रवेशाची अट घातली होती. संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर सेनेने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली.
या सर्व घडामोडींनंतर संभाजीराजेंनी राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी चर्चा करुन आपली भूमिका जाहीर करु असं सांगितलं होतं. त्याप्रमाणे गेल्या दोन दिवसांपासून संभाजीराजे विविध लोकांशी चर्चा करत असल्याची माहिती आहे. आता संभाजीराजे छत्रपती नेमकी काय भूमिका घेणार, ते निवडणूक लढणार की माघार घेणार हे शुक्रवारी स्पष्ट होणार आहे. या परिषदेला राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित राहणार आहेत.