नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये राहणाऱ्या भारतीयांकडून पंतप्रधान मोदींचे टोकियोमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी जय श्री राम’चा नारा देण्यात आला. तसेच पीएम मोदींना ‘लायन ऑफ मदर इंडिया’ असे संबोधण्यात आले. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी क्वाड समिटमध्ये सहभागी होण्यासाठी जपानला पोहोचले आहेत.
पंतप्रधान मोदींनी जपानमधील भारतीय नागरिक आणि स्थानिक लोकांचीही भेट घेतली. पंतप्रधान दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर आले आहेत. विशेषतः येथील क्वाड संमेलनामध्ये भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचे नेते सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात ते २३ वेगवेगळ्या बैठका घेणार आहेत. ते जगातील तीन मोठ्या नेत्यांना भेटणार असून, सर्वात महत्त्वाचे म्हणजे जपानची राजधानी टोकियोमध्ये मंगळवारी २४ मे रोजी होणाऱ्या क्वाड शिखर संमेलनात नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. ते जपानमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान यांच्यासोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत.