संभाजीराजेंनी शिवबंधन नाकारले; थेट कोल्हापूरकडे रवाना

मुंबई : राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवबंधनाची अट संभाजीराजे छत्रपती यांनी नाकारली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा आणि शिवसेनेत प्रवेश करण्याचा प्रस्ताव धुडकावत संभाजीराजे थेट कोल्हापूरला रवाना झाले आहेत.

 संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची निवडणूक  लढविण्याची घोषणा केल्यानंतर त्यांना शिवसेनेत घेण्याकडे हालचाली वाढल्या होत्या. दरम्यान काल, रविवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने संभाजीराजेंची भेट घेतली तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंना शिवबंधन बांधण्यासाठी वर्षावर सोमवारी दुपारी १२ वाजता या, असा निरोप दिला होता. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेनेत प्रवेशाची अट संभाजीराजेंना घालली आहे. मात्र, त्यांनी ती मान्य न करता मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणाकडे व शिवसेनेच्या प्रस्तावाकडे पाठ फिरवली असून ते थेट कोल्हापूरकडे रवाना झाले आहे. संभाजीराजेंना मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर शिवबंधन बांधण्यासाठी आमंत्रित केल्यामुळे संभाजीराजे काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या निमंत्रणाकडे पाठ फिरवली आहे. शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी संभाजीराजे अनुकूल नाहीत. महाविकास आघाडी म्हणून पाठिंबा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.