सिध्दनेर्ली : निकृष्ट जेवण देवून बांधकाम कामगारांचे आरोग्य बिघडवणारी मध्यान्ह भोजन योजना आहे. वेळोवेळी तक्रारी करूनसुद्धा जेवणामध्ये सुधारणा होत नसल्याने ठेकेदार पोसणारी असली कुचकामी योजना बंद करून या भोजन योजनेची रक्कम बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात वर्ग करावी. बांधकाम कामगारांचे आरोग्य सुरक्षित ठेवणारी मेडिक्लेम आरोग्य विमा योजना सुरू करावी.”अशी मागणी लाल बावटा संघटनेचे जिल्हा सेक्रेटरी शिवाजी मगदूम यांनी पत्रकाव्दारे केली आहे.
प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे, बांधकाम कामगारांना रोज सकस व पोटभर जेवण घेता यावे या हेतूने बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू आहे.परंतु मध्यान्ह भोजन योजनेतून मिळणाऱ्या जेवणाचा उग्र वास येतो. गुळ, लोणचे, बहुतांशी वेळा मिळतच नाही. कोशिंबिर कधीच मिळालेली नाही. त्यामुळे बांधकाम कामगारांच्या भावनांशी खेळले जात आहे.विविध बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणावर बांधकाम कामगारांना जेवण पोहोच केले जाते. मात्र या जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याच्या तक्रारी कामगार मधून सुरू असतानाही त्यामध्ये दुरुस्ती झालेली नाही. राज्यभरातील कामगारांच्या मध्यान्ह योजनेच्या ठेका एकाच कंत्राटदाराला दिल्याने या व्यवस्थेवर स्थानिक पातळीवर नियंत्रण ठेवणे मुश्कील बनले आहे.
ठेकेदाराला पोसणारी बांधकाम कामगारांची भोजन योजना कुचकामी ठरली आहे. ही योजना राज्यभर सुरू आहे. गेल्या जून महिन्यात कोल्हापुरात योजनेचा प्रारंभ झाला. त्यानुसार नागपूरच्या ठेकेदाराने स्थानिक स्तरावर आणखीन एकाला ठेका देऊन जेवण पुरवण्याची जबाबदारी त्याच्यावर दिली आहे. त्यानुसार कबनूर येथे एका खाजगी ठिकाणी जेवण बनवले जाते. हे जेवण जिल्ह्यातील विविध बांधकाम प्रकल्पावर बांधकाम कामगारांना सकाळ-संध्याकाळ दिले जाते. या जेवणामध्ये दोन चपात्या, भात, आमटी, भाजी, लोणचे, एक पॅकेट, गुळ दिला जात होता. सुरुवातीला या जेवणचा दर्जा चांगला होता. अलीकडे चपाती अर्धवट भाजलेली तर अनेवेळा नसते. भात कच्चा, आमटीची चव आंबट असते. लोणचं, भाजी बर्याच वेळा येत नाही. जेवण दिलेल्या वेळेत खाल्ले नाहीतर काही वेळातच खराब होते. त्यामुळे या जोजनेचे पैसे बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात वर्ग करावेत.