मुंबई : नवाब मलिक यांचे दाऊद गँगशी संबंध उघड झाले आहेतच. पण त्यांना मंत्रिमंडळात ठेवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही दाऊद गँगशी संबंध निर्माण झाले आहेत का? असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
नवाब मलिक यांचे दाऊद गँगशी संबंध असल्याचं प्रथमदर्शनी पुराव्यांच्या आधारे दिसतं अशी टिपण्णी न्यायालयानेनं केल्यानंतर सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
सोमय्या म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून सगळं मंत्रिमंडळ नवाब मलिकांसाठी मैदानात आलं होतं. आता न्यायालय सांगतंय की, नवाब मलिक म्हणजे दाऊद. आता उद्धव ठाकरे साहेब, या रस्त्यावर शरद पवारांसोबत आणि न्यायालयाविरुद्ध परत काढा मोर्चा. नाहीतरी तुमचे प्रवक्ते रोज न्यायालयाविरोधात बोलतात. उद्धव ठाकरेंनी जर सुरुवात केली की, न्यायालय देखील पाकिस्तानचं आहे, न्यायाधीशही मोदींचे आहेत तर आश्चर्य नाही वाटणार. खरंतर ही चौकशी न करताही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना सगळे आर्थिक व्यवहार माहिती होते. उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा तर बिल्डर आहे. बिल्डर लोकांना सगळं कळतं. मातोश्रीपासून फक्त चार किलोमीटरवर गोवावाला कंपाऊंड आहे. म्हणून उद्धव ठाकरेंना एफएसआयचा रेट वगैरे सगळं माहिती होतं. उद्धव ठाकरेंचे एजंट यशवंत जाधव यांनी गेल्या दोन वर्षांत अशा अनेक जुन्या बिल्डिंग विकत घेतल्या. हे नवाब मलिक काही लाखांत १०० कोटी बिझनेस टर्नओव्हरचा प्लॉट विकत घेतात. दाऊदचे पार्टनर नवाब मलिक, नवाब मलिकचे पार्टनर उद्धव ठाकरे उत्तर द्या.”, असं किरीट सोमय्या म्हणाले.