संभाजीराजे ‘गनिमी कावा’ करणार की, धनंजय महाडिकांना दिल्लीसाठी ‘चाल’ मिळणार ?

कोल्हापूर : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणूक जाहीर जाहीर झाली असून सहाव्या जागेसाठी संख्याबळाची गोळाबेरीज करून ‘कोंडी’ फोडत कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती ‘गनिमी कावा’ साधणार की, भाजपकडून प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांना दिल्लीसाठी ‘चाल’ मिळणार? याची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

राज्यसभेच्या सहा जागांपैकी संख्याबळानुसार दोन जागावर भाजप विजयी मिळवू शकते. तर महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला एका जागेवर विजय सहज मिळू शकतो. राहणाऱ्या एका जागेसाठी कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत महाविकास आघाडीचे अजून ठरलेलं नाही. पण या जागेवर शिवसेनेने दावा केला आहे.

दरम्यान, कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना करून राज्यसभेची जागा अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सहाव्या जागेसाठी पाठिंबा द्यावा अशी विनंती महाविकास आघाडी भाजप व अपक्ष आमदारांना केली. त्यांच्या विनंतीवरून महाविकास आघाडी व भाजप धर्म संकटात सापडला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजेंना पाठिंबा जाहीर केला. मात्र महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेताना शिवसेना व काँग्रेसला विचारावे लागेल असे सांगितले. तर शिवसेनेचे नेते परिवहन मंत्री अनिल परक व खासदार संजय राऊत यांनी शिवसेना सहावी जागा लढवणार असून दुसरा उमेदवार देणार असल्याचे जाहीर करत संभाजीराजेंची कोंडी केली आहे. संभाजीराजेंनी सेनेत प्रवेश करावा मग त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात येईल, अशी तहाची बोलणी शिवसेनेकडून सुरु असल्याची चर्चा आहे.

गेल्यावेळी राष्ट्रपती कोट्यातून संभाजीराजेंना खासदार करणाऱ्या भाजपने यावेळी सावध पवित्रा घेतला आहे. राज्यसभेच्या सहा जागापैकी दोन जागावर भाजप सहज जिंकू शकते. यातील एका जागेवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे नाव निश्चित आहे तर दुसऱ्या जागेवर कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचे नाव पुढे येत आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी धनंजय महाडिक काही दिवसात दिल्लीत दिसतील असे सुतोवाच केले होते. त्यामुळे भाजपच्या दुसऱ्या जागेसाठी धनंजय महाडिक यांचे नाव पुढे आले आहे. चंद्रकांतदादांनी आग्रह धरल्यास महाडिक हे माजीचे आजी खासदार निश्चितपणे होतील.

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती शिवसेनेचे नाराजी दूर करून राज्यसभेसाठी संख्याबळाचा गनिमी कावा साधत कोंडी फोडणार का? तसेच माजी खासदार धनंजय महाडिक यांना दिल्लीसाठी पुढेचाल मिळणार याची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे दोन्ही माजी खासदारांना अजय खासदार करून कोल्हापूरचा विकास साधला जावा अशी जिल्हा वासियांची इच्छा आहे.

आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपला २, शिवसेनेला १, राष्ट्रवादी कॉंग्रेसला १, काँग्रेसला १ अशा जागा मिळू शकतात. राज्यसभेसाठी निवडून येण्यासाठी ४१ आमदारांच्या मतांची गरज आहे. महाविकास आघाडीकडे २७ मतं अतिरिक्त आहेत तर भाजपकडे २२ मतं बाकी राहतात. त्यामुळे सर्वपक्षीय आमदारांच्या उरलेल्या संख्याबळाने जर संभाजीराजेंना पाठिंबा दिला तर संभाजीराजे निवडून येऊ शकतात.