वस्तुसंग्रहालये आजच्या काळातही प्रेरणादायी : संयोगिताराजे छत्रपती

कोल्हापूर : वस्तुसंग्रहालये ही आजच्या काळासाठी सुद्धा प्रेरणादायी आहेत. प्रांतिक इतिहास जीवनमुल्ये उलघडून दाखविण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. जीवन समृद्ध करण्यासाठी ही वस्तुसंग्रहालये महत्त्वपूर्ण असतात, असे प्रतिपादन युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी केले.

जागतिक वस्तुसंग्रहालय दिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यानमाला आणि ऑफलाईन चित्रपट महोत्सव या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे उद्घाटक, म्हणून त्या बोलत होत्या. वि.स. खांडेकर स्मृती संग्रहालय आणि पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती म्हणाल्या, वस्तुसंग्रहालयातून प्रत्येक व्यक्तींना काही ना काही घेण्यासारखे असते. माणसाची सृजनशिलता जागृत रहावयाची असेल तर माणसाला प्रश्न पडले पाहिजेत. त्या प्रश्नांची जागृतता वस्तुसंग्रहालयातून मिळते. वि. स. खांडेकरांचे साहित्य हिरव्या शाईच्या पेनातील आढळते. यातून ते निसर्गप्रेमी असल्याचे जाणवते. विविध विषयांना वाहिलेली आज संग्रहालये पहावयास मिळतात. एखाद्या विषयामध्ये खोलवर जाऊन किती काम करता येते याचा उलघडा या वस्तुसंग्रहालयातून होत असतो. छत्रपती संभाजीराजे, युवराज कुमार शहाजीराजे आम्ही जेव्हा जेव्हा परदेशात जातो. त्यावेळी तेथील सांस्कृतिक इतिहास जाणून घेण्याच्या दृष्टीने प्रथम वस्तुसंग्रहालयांना भेट देत असतो. शिवाजी विद्यापीठाने वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय यांच्या दृष्टीने साहित्यक अलोकिक कार्य केले आहे.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे प्र- कुलसचिव डॉ. व्ही. एन शिंदे होते. तसेच वि.स. खांडेकर स्मृती संग्रहालयाच्या संचालक डॉ. नीलांबरी जगताप यांनी प्रास्ताविक व आभार मानले. मराठी विभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.