सावकर मादनाईक यांचा जिल्हा नियोजन समिती सदस्यत्वाचा राजीनामा

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल उर्फ सावकर मादनाईक यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गुरुवारी त्यांच्या नियुक्तीची घोषणा झाली होती. मात्र, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे त्यांनी आज, शुक्रवारी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा सुपुर्द केला. यावेळी स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष शैलेश आडके उपस्थित होते.

पाच महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवडीबाबत यादी पाठवली होती. त्यावरती गुरुवारी शिक्कामोर्तव झाले. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना स्थान दिले होते. मात्र, त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

मादनाईक यांनी दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, माझी कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. सहा महिन्यापूर्वी या पदासाठी माझ्या नावाची शिफारस करण्यात आली होती. शेतकरी, पूरग्रस्त, कामगार, शेतमजूर या सर्वांना न्याय देण्यास महाविकास आघाडी सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे. एफआरपीची मोडतोड़ करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. दि. ५ एप्रिल २०२२ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडली आहे. तत्पूर्वी जिल्हा नियोजन समितीचे सदस्यपद मला नको आहे, असे कळवले होते. असे असताना देखील दि. १२ मे २०२२ रोजी झालेल्या शासन निर्णयामध्ये माझी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदाच्या यादीत माझे नाव आले आहे. शेतकऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारकडून कोणतेही पद मला नको आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा देत आहे.