मुंबई : आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही किंवा तलवारही खुपसत नाही आणि असे कधीही बोलतही नाही, असे प्रत्युत्तर असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाना पटोले यांना दिले.
पुणे येथे जनता दरबार उपक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पवार म्हणाले, नाना पटोले यांचे स्टेटमेंट चुकीचे आहे. ते कुठुन आले आहेत ते सर्वांना माहीत आहे. त्यामुळे भाजपने बोलावं का नाना पटोले यांनी पाठीत खंजीर खुपसला. हेडलाईन बनण्यासाठी ते बोलले असावेत. जबाबदार नेत्याने वक्तव्य करताना वेडेवाकडे परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. यावेळी आमचेही काही पदाधिकारी त्यांनी घेतले आहेत. १५ वर्षे कॉंग्रेस व राष्ट्रवादी या दोघांनी सरकार चालवले आहे. त्यावेळी कार्यकर्ते घेत होतो. इतर पक्षात जाऊन त्यांची ताकद वाढण्यापेक्षा एकमेकांच्या पक्षात राहतील हे पाहिले पाहिजे.
अजितदादा म्हणाले, सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो सरकारला मान्य करावा लागतो.राजद्रोह कलमाचा वापर करु नका असे सुप्रीम कोर्टाने केंद्रसरकारला सांगितले आहे. त्यामुळे त्या निर्णयाचे पालन केंद्रसरकार करणार आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. कार्यालय कुठे काढावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात देशभरातून लोक येत असतात. यूपीचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात भवन उभारणार आहेत त्याला आमचा विरोध नाही आम्हीही युपीत जाऊन भवन किंवा कार्यालय काढू शकतो.
मनसेचे बाळा नांदगावकर हे गृहमंत्र्यांना भेटले आहेत. प्रत्येकाला या राज्यात सुरक्षित वाटावं हे सरकारचं काम आहे. जी धमकी आली आहे किंवा जे काही माहिती त्यांनी दिली आहे त्याबाबत गृहमंत्री निर्णय घेतील. कुणाला संरक्षण दिले पाहिजे याबाबत एक समिती असते ते निर्णय घेतात हेही सांगितले.
शरद पवार हे एकटे राष्ट्रवादी चालवतात असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे त्यावर पत्रकारांनी अजित पवार यांना विचारले असता बहुतेक ठिकाणी तीच परिस्थिती असते. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे चालवत होते. तर भाजपमध्ये नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आला म्हणून भाजपच्या बोलणार्या लोकांना संधी मिळाली आणि आम्हाला आमच्या साहेबांमुळे संधी मिळाली. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या लोकांचा करिष्मा आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील बोलले ते खरे आहे. त्यांच्या बोलण्याला माझे अनुमोदन आहे असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.