भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या पाठीत सुरा खुपसला असून याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने युती केल्यानंतर नाराज झालेल्या नाना पटोले यांनी हे वक्तव्य केलं आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत पटोले विरुद्ध पटेल अर्थात नाना पटोले विरुद्ध प्रफुल्ल पटेल हा वाद पुन्हा एकदा उघड झाला. त्यामुळे नाना पटोलेंनी त्यावरून आपल्या ट्विटर हँडलवर खरमरीत शब्दांत ट्वीट केलं आहे.
काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, “राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली आहे. आम्ही यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि प्रफुल पटेल यांच्या सोबत चर्चा केली. त्यानंतरही राष्ट्रवादीने प्रत्येक ठिकाणी भाजपसोबत युती केली. गोंदिया जिल्हा परिषदमध्येसुध्दा राष्ट्रवादीने भाजपसोबत जात युती केली. राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला.
भंडारा आणि गोंदियात राष्ट्रवादीने मित्र पक्ष काँग्रेसची साथ सोडून भाजपबरोबर हात मिळवणी केली. यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या भंडारा जिल्ह्यातच महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. मात्र नाना पटोले यांनीही भाजपमधील एक गट फोडला. भाजपच्या चरण वाघमारे गटाने काँग्रेसला साथ दिली आणि त्या ठिकाणी अध्यक्षपद हे काँग्रेसला मिळालं. तर उपाध्यक्ष हे चरण वाघमारे गटाला मिळालं. भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेसचे 21, भाजपचे 12, राष्ट्रवादीचे 13 आणि शिवसेनेचा एक असं संख्याबळ आहे.
गोंदियामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीनं एकत्र येऊन काँग्रेसला एकटं पाडलं. तिथं अध्यक्षपदासाठी भाजपचे पंकज रहांगडाले आणि उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या यशवंत गणवीर यांची निवड झाली. महाविकास आघाडीत जरी पटोले आणि प्रफुल पटेल हे एक असले, तरी भंडारा-गोंदियात हे ऐक्य नाही. या दोघांमधील पारंपरिक वैर पुन्हा एकदा समोर आलं आहे.