१२ राज्यातील लोककलावंत वाहणार लोकराजाला आदरांजली

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत भारत सरकारच्या केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या दक्षिण मध्य क्षेत्र केंद्र नागपूर व कोल्हापूर जिल्हा प्रशासनामार्फत १२ राज्यातील १९० लोककलावंत कोल्हापूरात शाहू मिल येथील सभागृहामध्ये विविध लोककला सादर करणार आहेत.

या कलांचे सादरीकरण दिनांक १४ व १५ मे रोजी सायंकाळी ६  ते ९ या वेळेत होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमासाठी नागपूर दक्षिण मध्य क्षेत्र केंद्राचे संचालक दीपक खीरवाडकर, संभाजीराजे छत्रपती व जिल्हाधिकारी राहुल रेखावार प्रमुख उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम शहरातील खासदार-आमदार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

     कार्यक्रमात देशभरातील १२ राज्यातील १९० लोककलावंत आपल्या कलेतून राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली वाहणार आहेत.

   महाराष्ट्र   : पोवाडा, धनगरी गजा, सोंगी मुखवटे व लावणी

मध्य प्रदेश : गुदुम बाजा, छत्तीसगड  व पंथी नृत्य

 पंजाब      :  भांगडा नृत्य

 काश्मीर   :  रोफ नृत्य

 गुजरात    :  सिद्धी धमाल

आसाम    :  बिहू नृत्य

हरियाणा   :   घुमर

कर्नाटक   : हालकी सुग्गी कुनिथा

ही सर्व नृत्ये होणार असून प्रत्येक संघामध्ये १५ कलाकार सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे काही स्थानिक कलाकारही यावेळी आपले नृत्याविष्कार सादर करणार आहेत.         कार्यक्रमाचे संयोजक प्रमोद पाटील, चंद्रकांत पाटील आणि शाहू फाउंडेशन करत आहेत. श्री शाहू छत्रपती मिलमध्ये विविध राज्यातील कलावंतांच्या होणाऱ्या कार्यक्रमाचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.