कोल्हापूर : ज्या वृत्ती विरोधात छत्रपती शाहू महाराज लढले ती वृत्ती आज खरोखर संपली आहे का याचा विचार करण्याची गरज आहे. ती वृत्ती आता जिथे जिथे जिवंत असेल तिथे तिथे लढूया व सामाजिक समता स्थापित करून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांना अपेक्षित असलेला समाज आणि राज्य निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन काम करू, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा 100 वा स्मृतिदिन हा कृतज्ञता पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त शाहू मिल येथे आयोजित कृतज्ञता सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरभाष प्रणालीद्वारे मार्गदर्शन करत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे दुरभाष्य प्रणालीद्वारे पुणे येथून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाहू महाराज होते.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, अस्पृश्यांचा उद्धार, शिक्षण प्रसार, धरणे, वसतिगृहे, कृषी, उद्योग क्षेत्रात राजर्षि शाहू महाराजांचे काम डोंगराएवढे. हा दूरदृष्टी असलेला राजा, आज या कामासाठी वेगवेगळे विभाग आहेत पण या सगळ्या खात्यांचे काम एका माणसानं केलं असे सांगून ठाकरे पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याचे वारे वाहत असतांना अनेक राजे होऊन गेले. नुसते गादीवर बसले म्हणून राजे झाले असेही अनेकजण होते. पण शाहू महाराज हे गादीवर बसलेले राजे नव्हते. या राजाने सातत्याने दीनदुबळ्यांसाठी काम केलं, त्यांच्यासाठी संघर्ष केला. त्यांनी अस्पृश्य वर्गाला माणसाप्रमाणे वागवण्यासाठी संघर्ष केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, , शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा शाहू महाराजांनी पुढे नेला. शाहू महाराजांचे काम हे डोंगरा एवढे मोठे असून त्यांचा प्रत्येक विचार हा क्रांतिकारी होता. त्यांच्या सामाजिक न्याय विचारावरच सामाजिक क्रांती घडली, असेही त्यांनी यावेळी विशद केले. कोणत्याही महापुरुषाच्या स्मारकासाठी अंदाजपत्रकातील निधी ठेवण्याची आवश्यकता नाही तर अशा स्मारकासाठी जेवढा आवश्यक निधी असेल तो सर्व निधी देण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची असून शाहू स्मारकासाठी जेवढा लागेल तेवढा निधी शासन उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.
छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी विचार पुढे नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. तसेच मानवतावाद व समतावाद यावर विशेष लक्ष देऊन देशभरात जातिवाद पसरणार नाही याची काळजी घ्यावी व महाराजांचे समतेचे विचार देशभरात पोहोचावेत, असे आवाहन शाहू महाराज छत्रपती यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती दिनाचा हा कार्यक्रम ऐतिहासिक कार्यक्रम असून आपण पुरोगामी विचारांचे वारसदार आहोत याचा अभिमान वाटतो, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगून सर्व संत परंपरातील विचारधारा ही समतेवर आधारित असून शाहू महाराज हे समतेचा विचार कृतीत आणणारे लोकराजा होते असे त्यांनी म्हटले. तसेच शाहू मिलच्या या 27 एकर जागेवर शाहू स्मारकाचा जो अभिनव प्रकल्प राबविण्यात येणार आहे, त्या प्रकल्पाच्या कामासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल याची ग्वाही दिली.
देशभरात जातिवाद व भेदभाव भडकावण्याचे काम केले जात आहे अशा परिस्थितीत छत्रपती शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांची देशाला गरज असून हे विचार देशभर पोहचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिनस्त सर्व महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराजांचे चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येईल व शाहू विचारांचा जागर विद्यार्थ्या पर्यंत पोहोचविला जाईल असे उच्च व तंत्र शक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगून छत्रपती शाहूंच्या शंभर वर्षापूर्वीच्या नियमावलीचे पालन शासन आजही करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रयतेचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले व त्यांचे समतेचे विचार देशभरात पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आपण प्रथमच संसदेमध्ये शिवजयंती व शाहू जयंती साजरी केली, अशी माहिती माजी खासदार संभाजीराजे यांनी दिली.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा शंभरावा स्मृतिदिन हा कृतज्ञता पर्व म्हणून दिनांक 18 एप्रिल 2022 ते 22 मे 2022 या कालावधीत साजरा केला जात आहे. छत्रपती शाहू महाराजांनी सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास केला. राज्य व देशाला समतेचा संदेश दिला. त्यांचे हे विचार या माध्यमातून तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी राहुल रेखावार व कृतज्ञता पर्व समितीने मोठी मेहनत घेतली आहे..
