उचगांव,गांधीनगर,वळीवडे,गडमुडशिंगी, चिंचवाडमधील ओढे, नाले,गटारी साफ करा : शिवसेनेची मागणी

उचगाव : पंचगंगा नदीकाठी असणाऱ्या उचगांव गांधीनगर, वळीवडे, गडमुडशिंगी, चिंचवाड, मधील ओढे, नाले, गटारी पावसाळ्यापुर्वी साफ कराव्यात, अशी मागणी करवीर तालुका शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख कापड बाजार पेठ असून गांधीनगर मेन रोड हा उचगांव, गडमुडशिंगी, वळीवडे, चिंचवाड, सह गांधीनगर अशा पाच गावांच्या हद्दीत येतो मेनरोड पासून अगदी जवळ पंचगंगा नदी असून गांधीनगर मेनरोडला दुतर्फा मोठ मोठे व्यापारी संकुल असुन त्या मेनरोडवरील सर्व गटारी प्लास्टीक कचरा व इतर कचऱ्याने तुडुंब भरले आहेत.तसेच गडमुडशिंगीहून आलेला ओढा त्याच्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे त्याला गटारीचे स्वरूप आले असून तोही प्लास्टीक कचऱ्यासह इतर कचऱ्याने तुडुंब भरलेला आहे पहिल्या पावसामध्ये या सर्व गटारी नाले व ओढ्यातील कचरा थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळतो त्यामुळे पंचगंगा नदी प्रदुषीत होते व गटारी, ओढा तुंबल्याने गांधीनगर मेनरोडवर व तळमजल्यामध्ये असणाऱ्या दुकानामध्ये पाणी जावुन व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते उंचगावातील ओढा ही कचऱ्याने तुडुंब भरला असून तो ही साफ करण्याच्या सुचना द्याव्यात. गांधीनगर मुख्य रस्ताही नवीन होत असल्याने गटारी तुंबल्या की रस्त्यावर पाणी साचण्याचा धोका असुन नवीन रस्ताही खराब होण्याची शक्यता आहे. तरी पाणी निचरा होण्यासाठी पावसाळ्यापुर्वी या पाचही गावातील ओढे, नाले, गटारी साफ करण्याच्या सुचना संबंधीत ग्रामपंचायतीला देण्यात याव्यात व पंचगंगा नदी प्रदुषण होण्यापासून रोखावे.
या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीने करवीरचे गटविकास अधिकारी जयवंत दशरथ उगले

यांना देण्यात आले.यावेळी उगले यांनी संबंधित ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांची तातडीने बैठक घेऊन ओढे-नाले-गटारी लवकरात लवकर साफ करून घेण्यासाठी सूचना करू असे आश्वासन त्यांनी करवीर शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.

यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपतालुकाप्रमुख पोपट दांगट,मा.उपसरपंच पै. बाबुराव पाटील,युवासेना उपतालुका अधिकारी प्रफुल्ल घोरपडे, अजित चव्हाण, अपंग सेनेचे संदीप दळवी, दीपक पोपटाणी, दीपक फ्रेमवाला, सुनील पारपाणी,दीपक धिंग आदी उपस्थित होते.