जोपर्यंत भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत राज ठाकरे महाराष्ट्राचं कौतुक करणार नाहीत : जयंत पाटील

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोपर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहे तोवर महाराष्ट्राचे कौतूक करायचे नाही, असं ठरवलं असेल. त्यामुळे ते दुसऱ्या राज्याचे कौतूक ते करणारचं, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरविल्यानंतर राज ठाकरे यांनी कौतूक केलं होतं. त्यावरून जयंत पाटलांनी शाब्दिक टोलेबाजी केली आहे.

पाटील म्हणाले, एकदा गुजरातचं कौतूक करून झालं. आता युपीचं कौतूक करतील. महाराष्ट्र सोडून सर्व राज्यांचे कौतूक करतील आणि महाराष्ट्र सोडून सर्व राज्यांचे कौतूक करायला दौरे काढतील. दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन त्या राज्यांचे कौतूक राज ठाकरे करतचं राहणार आहेत.

भारतात प्रचंड महागाई वाढलेली आहे. त्याचे दुष्परिणाम श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये पाहायला मिळत आहेत. खरे महागाईचे मुळ केंद्रात आहे हे विसरता येणार नाही. देशातील महागाईची जबाबदारी राज्याराज्यावर टाकून हात झटकण्याचा प्रयत्न होत आहे, असा घणाघात जयंत पाटलांनी केला.