मुंबई : आज काही दिवस आपण बघतोय जात – धर्म यांच्या नावाने पुन्हा एकदा देशाला मागे नेण्याचा प्रयत्न सुरू केला जातोय. लोकांचा मुलभूत प्रश्न काय आहे तर महागाईचा… अन्नधान्याचा… बेरोजगारीचा… सन्मानाने जगण्याचा आहे… या प्रश्नांकडे कुणाचं लक्ष नाही. काही लोक भलत्याच मागण्या करताना दिसत आहेत. त्यामुळे आपण संभ्रमात पडतो. या सगळ्या गोष्टीला उत्तर देण्याची भूमिका घ्यायची असेल तर शाहू – फुले – आंबेडकरांचा विचार हाच ख-या अर्थाने आपल्याला दृष्टी आणि शक्ती देणारा आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या विमुक्त जाती, भटक्या जमाती मागासवर्गीय सेलच्यावतीने कृतज्ञता गौरव सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शरद पवार बोलत होते.
सर्व समाजाला मुख्य प्रश्नापासून बाजूला नेण्याचा प्रयत्न होतोय. आज टेलिव्हिजनवर काही दिवस काय बघतोय तर कुणाची सभा आहे… हे करणार ते करणार… हनुमानाच्या नावाने करणार… आणखी कुणाच्या नावाने करणार…या सगळ्या चर्चा… मागण्या याने बेकारीचा प्रश्न… भुकेचा प्रश्न सुटणार आहे का? तुमच्यावर पिढ्यानपिढ्या होणारा अन्याय सुटणार आहे का? असा सवाल करतानाच मुळ प्रश्नाला बगल देऊन भलत्याच गोष्टींकडे समाजाला वळवून स्वतः चा स्वार्थ साधत काही घटकांनी निकाल घेतला आणि त्या गोष्टीला प्रसिद्धी मिळते अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.
शाहू – फुले – आंबेडकरांचे नाव घेतो म्हणून एका नेत्याने टिका केल्याचा उल्लेख करताना मग नावं कुणाची घ्यायची असा सवाल करत शाहू – फुले आंबेडकरांचे नाव का घेतो याबाबतची माहिती शरद पवार यांनी दिली. आज श्रीलंकेत दंगा सुरू आहे. दुसरीकडे पाकिस्तानमध्ये पंतप्रधानांना जावं लागलं मात्र हिंदूस्थान एवढा मोठा देश आहे. अनेक भाषा… अनेक जाती आहेत. त्यामुळे हा एकसंघ राहिला याचं कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आहे असेही शरद पवार म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, आज व्हिजेएनटीच्यावतीने अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत त्यात शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ही मागणी रास्त आहे. शिक्षणाने सुवर्णसंधी मिळते. जो शिक्षणाची कास धरतो त्याचा उध्दार होतो. वंचितांच्या मागे उभे राहण्याची कल्पना… भूमिका पवारसाहेबांची राहिली आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, सेलचे अध्यक्ष हिरालाल राठोड यांनीही आपले विचार मांडले., प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सेलचे अध्यक्ष हिरालाल राठोड आदींसह सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.