डी. वाय. पाटील ग्रुप ‘युएस-इंडिया ट्रेड अवार्ड’ ने सन्मानित

कसबा बावडा (वार्ताहर) : गेल्या चार दशकांपासून शैक्षणिक क्षेत्रात असीम योगदान देणाऱ्या व त्याबद्दल विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या डी. वाय. पाटील ग्रुपच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून भारत- अमेरिका व्यापार वृद्धीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपला ‘युएस-इंडिया ट्रेड अवार्ड-२०२२’ (युएसआयटीए) या प्रतिष्ठीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

युएस इंडिया इम्पोर्टर कौन्सिलच्या दहाव्या स्थापना दिवसानिमित्त मुंबईतील हॉटेल ताजमहल पॅलेस येथे गुरुवारी सायंकाळी झालेल्या विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता यांनी अमेरिकन वाणिज्य दुतावासाचे प्रमुख कॉन्स्युल जनरल डेव्हिड जे. रांझ यांच्याहस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

या सोहळ्याला खासदार अरविंद सावंत, खासदार गोपाळ शेट्टी, राज्याचे उपलोकायुक्त व युएसआयटीएचे ज्युरी चेअरमन संजय भाटीया, प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, कस्टम विभागाचे मुख्य आयुक्त पी. के. अग्रवाल, जवाहरलाल नेहरू कस्टम हाउसचे मुख्य आयुक्त एम. के. सिंग, गॅलक्सी सरफॅक्टटचे कार्यकारी संचालक के. नटराजन, युएसइंडिया इम्पोर्टर कौन्सिलचे अध्यक्ष आर. के. पिल्लई, स्थापना दिवस समारंभाचे अध्यक्ष आशिष पेडणेकर आदी उपस्थित होते.

डी. वाय. पाटील ग्रुपची महाराष्ट्रात 3 अभिमत विद्यापीठे (मेडिकल) व ४ खासगी विद्यापीठे असून १७२ महाविद्यालये कार्यरत आहेत. विविध संस्थांच्या माध्यमातून मेडिकल, इंजिनीअरिंग, फार्मसी, अॅग्रीकल्चर, डेंटल, मॅनेजमेंट, नर्सिंग, फ़िजिओथेरपी, हॉस्पीटलीटी, पॉलीटेक्निक आदी क्षेत्रातील अभ्यासक्रम तसेच के.जी पासून पीएच. डी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. ग्रुपच्या विविध महाविद्यालयामधून सुमारे ४ लाख विद्यार्थी पास आउट झाले आहेत. डी. वाय. पाटील ग्रुपचे २२ हजाराहून अधिक माजी विद्यार्थी अमेरिकेतील विविध कंपन्यामध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. या विद्यार्थ्यांच्या योगदानामुळे भारत व अमेरिका यांच्यातील व्यापार संबंधाना पाठबळ मिळाले असून त्याची दखल घेऊन ‘युएस-इंडिया ट्रेड अवार्ड-२०२२ पुरस्काराने डी. वाय. पाटील ग्रुपचा सन्मान करण्यात आला.

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी. वाय. पाटील ग्रुपने शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेचे नवनवे मापदंड निर्माण केले आहेत. हा पुरस्कार स्वीकारताना आपल्याला अत्यानंद होत आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्याना अत्याधुनिक सोई-सुविधायुक्त उत्तम शिक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. भविष्यातही डी. वाय. पाटील ग्रुप यशाची नवी शिखरे गाठेल असा विश्वास डॉ. संजय डी. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.