नवी दिल्ली : मशिदींवरील भोंग्याचा वाद भाजपनेच उकरून काढला आहे. भाजपच्या इशाऱ्यावरच हा मुद्दा तापवला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार बैठकीत केला. भोंग्यांबाबत एवढे आक्रमक असाल तर अजूनही गुजरात, उत्तर प्रदेश, बिहारमधील भोंगे का काढले नाहीत, असा सवालही त्यांनी केला. भोंग्यांबाबतचा वाद शमवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशपातळीवर एकच धोरण बनवावे व ते सर्व राज्यांना लागू करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, हे धोरण लागू केल्यानंतर भाजपशासित राज्यांमधील मशिदींवरील भोंगे उतरावेत, असेही राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले, केंद्र सरकारने धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत राष्ट्रीय धोरण बनवावे व ते संपुर्ण देशात ते लागू करावे. देशभरासह राज्यात सध्या जे राजकीय भोंगे वाजत आहे, त्यांना शांत करण्यासाठी हा निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप करणाऱ्या पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांना केंद्राकडून संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. केंद्र सरकारने देशपातळीवर गोवंश हत्याबंदीचा निर्णय घेतला. मात्र, नंतर त्यांच्याच भाजपशासित राज्यांनी हे धोरण आपल्या राज्यात लागू करण्यास नकार दिला. यात गोवा व नॉर्थ ईस्टमधील राज्यांचा समावेश आहे. त्यामुळे केंद्राने भोंग्यांबाबत धोरण लागू करताना ही काळजी घ्यावी व सर्व राज्यांमध्ये हे धोरण लागू हे पाहावे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचे प्रकरण समोर येताच या प्रकरणात आरोपी असलेल्या पोलिस नाना पटोले, एकनाथ खडसे, माझ्यासहित सर्वांना समाजविघातक घटक असल्याचं खोटं सांगत फोन टॅप करण्यात आले होते हे समोर आलं आहे. अधिकारी रश्मी शुक्ला यांना केंद्र सरकारने आपल्या सेवेत रुजू करून घेतले आहे. भाजपच्या राजकीय नेत्यांवरील निष्ठेसाठीच रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केले. त्यामाध्यमातून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा भाजपचा डाव होता. त्यामुळेच या प्रकरणातील आरोपींना आता थेट केंद्राकडून संरक्षण दिले जात आहे.