कोल्हापूरकरांना २४ तास वीज द्या, रहदारीला अडथळा ठरणारे खांब हटवा : भाजपची मागणी

कोल्हापूर : विजेच्या भारनियमनात वाढ झाली आहे. कोल्हापूरकरांना २४ तास वीज पुरवठा करावा. तसेच रस्त्यातील उघड्यावरील डीपी आणि रहदारीला अडथळा ठरणारे विजेचे खांब हटवावेत, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने महावितरणचे अधिक्षक अभियंता अंकुश कवाळे यांच्याकडे केली.

सध्या कडक उन्हाचे चटके चांगलेच बसू लागले आहेत. त्यातून मुक्तता मिळण्यासाठी पंखे, कुलर आणि एसी यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय. वाढत्या उष्म्यामुळं नागरीक हैराण झाले आहेत. अशातच वीज वितरण कंपनीकडून भारनियमन केलं जात आहे. भारनियमन कमी करावं, या प्रमुख मागणीसाठी, भाजपच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या कार्यालयावर धडक मारली. भारनियमनाबाबत सत्यजित कदम यांनी अधीक्षक अभियंता अंकुश कवाळे यांना जाब विचारला. राज्यात कोळशाचा तुटवडा, तसेच कोयना धरणात पाणी साठा कमी होत असल्यानं, वीज निर्मितीमध्ये अडथळे येत आहेत. भारनियमन कमी करण्याबाबत प्रयत्न करू, अशी ग्वाही कवाळे यांनी दिली.

 

दरम्यान, शहरात बर्‍याच ठिकाणी उघड्यावर असणारे डिपी आणि धोकादायक स्थितीत असलेले विजेचे खांब, ट्रान्स्फार्मर याबाबत सर्व्हे करावा आणि पूर परिस्थिती दरम्यान अडचणीचे ठरणारे खांब आणि विद्युत वाहिन्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी सुनील कदम यांनी केली. याबाबत येत्या आठवड्यात सर्व्हे करणार असल्याचं कवाळे यांनी सांगितलं. मागण्यांचं निवेदन कवाळे यांना देण्यात आलं.

शिष्टमंडळात माजी नगरसेवक आशिष ढवळे, विजय सूर्यवंशी, राजसिंह शेळके, विजय घोरपडे, होशांग जाधव, निरंजन शिंदे, सचिन बिरंजे, राहूल पाटील यांचा समावेश होता.

🤙 9921334545