शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त सोमवारपासून लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी निमित्ताने शासन आणि लोकांच्या वतीने लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व १८ एप्रिल ते २२ मे २०२२ या कालावधीत विविध उपक्रम आयोजित करून राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी ६ मे २०२२ रोजी लोकराजाला कोल्हापूरच्या जनतेकडून आदरांजली वाहण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमाच्या आयोजनाबाबत पालकमंत्री सतेज पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर व सर्व लोकप्रतिनिधी यांनी जिल्यातील सर्व संस्था , संघटना व नागरिकांनी उ्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

        राजर्षी शाहू महाराजांनी जोतिबा यात्रेनंतर छ. ताराराणी व छ. शिवाजी महाराजांच्या रथोस्वाची सुरुवात केली होती. हेच औचित्य साधून दिनांक १८ एप्रिल रोजी या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर लोकराजा कृतज्ञता पर्वामध्ये  एप्रिल महिन्यामध्ये छ. शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा, आदेश व छायाचित्रांचे प्रदर्शन  दि. २३ एप्रिल ते दि. २२ मे या एक महिन्यासाठी शाहू छत्रपती मिल येथे आयोजित केले जाणार आहे. दि. २४ एप्रिल रोजी मॅरेथॉन व एकाच वेळी १०० चित्रकारांची कला सादरीकरण शाहू मिल येथे होणार आहे, सिटी बझार या संकल्पने अंतर्गत २२ , २३ व २४ एप्रिल रोजी गुजरी येथे कोल्हापुरी दागिन्यांची गुजरी जत्रा होणार आहे. २८, २९ व ३० एप्रिल दरम्यान पुस्तक प्रदर्शन व विक्री शाहू मिल येथे होणार आहे. तसेच शालेय मुलांसाठी शाहू महराजांच्या जीवनावर व कार्यावर आधारित तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा व वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येतील. मे महिन्यामध्ये १ मे रोजी सायकल रॅली , दि. २ मे ४ मे दरम्यान लोकराजा इंनोवेशन कॉम्पिटीशन व प्रदर्शन, नव उद्योग ,व्यवसाय यांना प्रोत्साहन देन्यासाठी लोकराजा स्टार्टअप आणि गुंतवणूकदार समिट याचे आयोजन होईल.

        दिनाक ५ मे रोजी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा , विचारांचा , दृषटिकोनाचा परिचय करुन देण्यासाठी शंभर वक्ते एकाच वेळी शंभर ठिकाणी व्याख्याने देवून त्यांचा वारसा कायम राखण्यासाठी कटिबध्द होतील. ६ मे रोजी जिल्ह्यात सर्वच ठिकाणी आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. शहरात सकाळी शाहू जन्म स्थळ , नवा राजवाडा , रेल्वे स्टेशन , शाहू मिल , साठमारी , कुस्ती मैदान , बावडेकर आखाडा , गंगावेस तालीम , शिवसागर , रजपूतवाडी व भवानी मंडप येथून कृतज्ञता फेरी काढण्यात येवून त्या शाहू समाधी स्थळ येथे येऊन पुष्पांजली वाहतील, पुष्पांजली वहिल्या नंतर शंभर सेकंद सर्व शहर श्रद्धांजली वाहण्यासाठी स्तब्ध राहील. तर ६ मे रोजी संध्याकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्य कृतज्ञता पर्वाचा कार्यक्रम होईल व याच दरम्यान चित्ररथ फेरी सुरु होईल जी शहरातील प्रमुख रस्त्यावरून फेरी मारून नंतर प्रत्येक तालुक्यात जाईल.  सिटी बझार मध्ये ७ मे ते ९ दरम्यान लक्ष्मीपुरी मध्ये कोल्हापूर मिरची व मसाला मसाला जत्रा व शाहू मिल येथे कापड जत्रा याचे आयोजन करण्यात येईल, १३ मे ते १५ मे दरम्यान चप्पल लाईन मध्ये कोल्हापुरी चपला, कुंभार गल्लीत मातीच्या वस्तू , बुरुड गल्लीत बांबू पासून तयार करण्यात आलेल्या वस्तू  व २० ते २२ मे दरम्यान शाहू मिल येथे गूळ, तांदूळ, वन उप्तादन, महिला बचत गट व कृषी प्रदर्शन अशी महाराजांनी प्रोत्साहन दिलेल्या व्यावसायिकांच्या कडून कृतज्ञेने पर्यटक व स्थानिक लोकांना दर्जेदार व योग्य किमतीमध्ये उपलब्ध करून देवून आदरांजली वाहिली जाईल.

     ८ मे पासून शालेय स्तरावर कुस्ती स्पर्धा होतील व २१ मे व २२ मे दरम्यान खासबाग मैदान येथे निमंत्रित मल्लाच्या शाहू केसरी स्पर्धा होतील. सदर स्पर्धे दरम्यान शाहूमहाराजानी आश्रय दिलेल्या मल्लांच्या कुटुंबीयांचा स्नेह मेळावा होणार आहे. १५ मे ते २१ मे दरम्यान शाहू फुटबॉल लीग चे आयोजन करण्यात येईल. तर नाटक , शाहिरी , संगीत नाटक , मर्दानी खेळ , आदी कार्यक्रम आयोजित विविध ठिकाणी विविध दिवशी करून कलेला राजाश्रय देणाऱ्या राजा प्रती कृतज्ञता व्यक्त करतील.या सर्व उपक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी ही विविध संस्था,  संघटना, मंडळे यांनी उत्स्फूर्तपणे स्वीकारून लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.