मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका पाठोपाठ एक अशी १४ ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करतात. पण सार्वजनिक जीवनात आंबेडकरांच्या राजकीय भूमिकेच्या अगदी विरुद्ध असे वागतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कलम ३७० ला तीव्र विरोध होता. पण या मुद्यावर पवारांची भूमिका वेगळी आहे. शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ३७० हटविण्याला विरोध असल्याचे चित्र असल्याचेही फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.
फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कलम ३७०ला विरोध होता आणि याबाबत पवारांची काय भूमिका ते सर्वांना ठाऊक आहे. त्याचबरोबर बाबासाहेबांचा काश्मीरला विशेष दर्जा द्यायलाही विरोध होता. याबद्दलही पवारांची भूमिका सर्वाना ठाऊक आहे. काश्मीर फाईल चित्रपटावरून पवारांनी घेतलेल्या भूमिकेचाही त्यांनी समाचार घेतला आहे. नवाब मलिक यांना अटक होताच ते मुस्लीम आहेत म्हणून त्यांचा दाऊदबरोबर संबंध जोडला जातो, असे पवार म्हणाले होते. हे कितपत योग्य आहे? इशरत जहाही निर्दोष आहे असेही पवार म्हणाले होते. याचीही ट्विटमध्ये आठवण करून दिली आहे.
राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी इशरत जहाच्या मदतीसाठी कसे प्रयत्न केले होते हेसुद्धा नमूद ट्विटमध्ये नमूद केले आहे. आझाद मैदानात झालेल्या हिंसाचारानंतर तपासात ढिलाई दाखवली आणि हा हिंसाचार घडवणाऱ्या रझा अकादमीवर कारवाई केली नाही. याचीही ट्विटमध्ये आठवण करून दिली आहे. संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध असतानासुद्धा पवारांनी मुस्लीम आरक्षणासाठी प्रयत्न केले होते. सच्चर आयोगाच्या शिफारशींना कोणी पाठिंबा दिला होता हे पवारांनी सांगावे. तसेच अल्पसंख्यांक समाज कोणाचाही पराभव करू शकतो, असेही पवार म्हणाले होते. याचीही आठवण करून देण्यात आली आहे. मुंबई बॉम्बस्फोटानंतर १३वा बॉम्बस्फोट मुस्लीम वस्तीत झाला होता अशी खोटी माहिती पवारांनी दिली होती. याचीही आठवण फडणवीस यांनी करून दिली आहे. हिंदूंच्याबाबतीत टेरर शब्द कोणी वापरला होता? काश्मीर फाईल चित्रपटात काश्मिरी पंडितांच्या वेदनांचे चित्रीकरण असताना त्याबाबत तुमचा दुटप्पीपणा का? काश्मीर फाईल हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मग केवळ अनुनयाच्या हेतूने जातीय द्वेष पसरवण्याचा प्रयत्न का? असा सवालही ट्विटमध्ये करण्यात आला आहे.