कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक लागायची गरज नव्हती मात्र भाजपने ती लादली. मात्र, पंचवीस हजाराच्या मताधिक्याने महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव विजयी होतील, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या मतदानानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. सतेज पाटील म्हणाले, काल भाजपने पैसे देऊन लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न केला. तो जनतेने हाणून पाडला. भाजपचे काही ठिकाणी बुथही नव्हते. महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी प्रामाणिकपणे काम केल्याने जयश्री जाधव या शंभर टक्के विजय होतील.
पाटील म्हणाले, आम्ही कोल्हापूरच्या विकासाचे व्हिजन, विकासकामे घेऊन पुढे जातोय. पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का कमी असतो, यावेळीही एक टक्का मतदान कमी झाले आहे. याचा अर्थ महा वकास आघाडी विजयी होणार .एका भगिनीच्या पराभवासाठी भाजपचे दिग्गज कोल्हापुरात आले होते. मात्र लोकांचा विश्वास महाआघाडीवर आहे. माजी पालकमंत्री यांच्या सोबत कोल्हापुरातील एकही गाडी नव्हती त्यांच्या मागेपुढे सर्व गाड्या पुण्यातील होत्या. मी विरोधी पक्षाला सांगू इच्छितो प्रशासन हे कायम असते त्यांना बदनाम करू नका. भाजपचे प्रमुख कार्यकर्ते पैसे घेताना सापडले. भाजपकडून पैशाचा वापर झाला. ऐनकेन प्रकारे निवडणूक जिंकण्यासाठी लोकशाहीला घातक कृत्ये करणे चुकीचे असून प्रशासनाने प्रामाणिकपणे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.