सत्यजित कदम यांचा विजय निश्चित : चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात मतदानाचा टक्का वाढला आहे, त्याचा फायदा भाजपला होणार असून नवमतदारानीही आपले मतदान भाजपच्या पारड्यात टाकले असल्याने भाजपच्या सत्यजित कदम यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक संपल्यानंतर चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, उमेदवार सत्यजित कदम, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते.

चंद्रकांत दादा म्हणाले, प्रशासनावर प्रचंड दबाव असतानाही त्यांनी चांगले काम केले. तीही माणसे आहेत त्यांनाही चौकट आहे. भाजपच्या पाच पंचवीस कार्यकर्त्यांना अटक करण्याचा तसेच इथे पैसे पकडले, तिथे पैसे सापडले सांगून पेपरमध्ये बातमी छापून आणून बदनामी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पैसे वाटण्याचा प्रयत्न नव्हता. पैसे वाटप करताना कोण सापडले का ? पण कार्यकर्त्यांच्या घरात असून दबाव निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

मा विकास आघाडीला भगव्या रंगाची अलर्जी आहे. मंडपाचे भगव्या रंगाचे कापड, टोपी, गळ्यातील भगवा स्कार्फ यांना खटकतो. शिवसेनेचाही भगवा रंग आहे. भगवा रंग शौर्याचे प्रतीक असून तो छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांचाही होता. मात्र यांनी भगव्या रंगावरून भडकावण्याचा प्रयत्न केला आहे.