गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढणार; कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी झालेल्या हल्लाप्रकरणी अटकेत असलेले गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी वाढत आहेत. मराठा आरक्षणाविरोधात लढण्यासाठी सदावर्ते यांनी बेकायदेशीररित्या पैसे गोळा केल्याचा आरोप करत यासंबंधी तशी तक्रार कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या न्यायालयीन लढ्यासाठी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याचा आरोप झाला असतानाच, आता मराठा आरक्षणाविरोधात लढण्यासाठी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी बेकायदेशीररित्या पैसे गोळा केल्याचा नवा आरोप करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावरील हल्ला प्रकरणात आंदोलकांना चिथावल्याच्या आरोपांखाली वकील गुणरत्न सदावर्ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. दुसरीकडे, सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करून फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आता कोल्हापुरातही सदावर्तें यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयीन लढ्यासाठी सदावर्ते यांनी बेकायदेशीररित्या पैसे गोळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात सदावर्ते यांच्याविरोधात दिलीप पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे. सदावर्ते यांनी गोळा केलेल्या पैशांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे. तर न्यायाधीश रणजीत मोरे यांचा अवमान होईल, अशी वक्तव्ये केल्याचाही तक्रारीत उल्लेख केला आहे.