मुंबई : राज्यात सर्वत्र उष्णतेचा कहर दिसत असताना अनेक ठिकाणी अवकाळीची हजेरी शेतकऱ्यांसाठी चिंताजनक व्हायला लागली आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापुरात अवकाळी पावसानं खूपच नुकसान केलं आहे. सांगोला तालुक्याला काल पुन्हा बसलेल्या गारपीट आणि अवकाळीच्या दणक्याने या भागातील फळबागा आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणातही आंबा बागांचे नुकसान झाले आहे.
सांगोल्याला ऐन उन्हाळ्यात काल सायंकाळी पुन्हा एकदा अवकाळी पावसाने झोडपून काढले असून अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने मोठे नुकसान झाले आहेत. सांगोला तालुक्यात वारंवार अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत असल्याने शेतक-यांचे आतोनात नुकसान होत आहे. वादळी वारा आणि गारपिटीमुळे द्राक्षे, आंबा, कलिंगड, डाळिंब या फळबागा उद्ध्वस्त होत आहेत. तालुक्यातील मेडशिंगे, अजनाळे, पारे, वाढेगाव परिसरातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत, झाडे पडल्यानेही अनेक घरांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने अनेक गावातील विजेचे खांब पडल्याने वीज गायब झाली असून सुदैवाने मनुष्यहानी झाल्याचे वृत्त नाही.

सांगली जिल्ह्यातही वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. मिरज शहरात जोरदार गारपीट झाली. अवकाळीमुळे बेदाणा आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यात बेदाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जतमध्येही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड हापूस आंब्याला फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणी हापूस आंब्याची झाडेच्या झाडे कोसळून पडली असून झाडाखाली आंबे गळून पडल्याने बागायतदारांचे खूप नुकसान झाले आहे. आधीच वातावरणातील वारंवार होणारे बदल, अवकाळी पाऊस, थ्रीप्सचा प्रादुर्भाव या संकटांना तोंड देता देता आंबा बागायतदार मेटाकुटीला आला होता. नुकतेच कुठे एप्रिल महिन्यात आंबा मार्केटमध्ये पाठविण्यास सुरुवात झाली असताना वादळासह आलेल्या अवकाळी पावसाने बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.